अहिल्यानगर : शहरात आक्षेपार्ह पत्रके भिरकावल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवशक्ती- भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा उद्या, रविवारी शहरात काढण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप, ॲड. वाल्मीक निकाळजे व इतर हिंदुत्ववादी या मोर्चात सहभागी होणार आहेत. दरम्यान याच घटनेच्या निषेधार्थ आज, शनिवारी दुपारपर्यंत भिंगारमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार अससुद्दीन ओवैसी यांची नगरमध्ये सभा झाली. या सभेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतर नेत्यांनी आमदार जगताप व भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. या वक्तव्याला जगताप व राणे यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेचा संदर्भ होता. त्यामुळे एमआयएमच्या आरोपांना जगताप काय प्रत्युत्तर देतात हे समारोपाच्या मोर्चा सभेत स्पष्ट होईल.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर असलेले कागद शहरातील उड्डाणपुलावरून भिरकावण्यात आले होते. शहरातील इम्पिरियल चौकात ही घटना घडली. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकास अटक केली.
या पार्श्वभूमीवर अवमानकारक लिखाणाच्या निषेधार्थ शिवशक्ती-भिभशक्तीचा जनआक्रोश मोर्चा उद्या काढला जाणार आहे. सकाळी ११ वा. जुन्या बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून या मोर्चास सुरुवात होईल. बाजार समिती चौकातील आंबेडकर स्मारकास अभिवादन करून माळीवाडा, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, तख्ती दरवाजा, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंट, चितळे रस्ता, चौपाटी कारंजामार्गे दिल्लीगेट वेशीजवळ समारोप व सभा होणार आहे.
दोन दिवसांपूर्वी एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार अससुद्दीन ओवैसी यांची नगरमध्ये सभा झाली. या सभेत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह इतर नेत्यांनी आमदार जगताप व भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली. या वक्तव्याला जगताप व राणे यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेचा संदर्भ होता. त्यामुळे एमआयएमच्या आरोपांना जगताप काय प्रत्युत्तर देतात हे समारोपाच्या मोर्चा सभेत स्पष्ट होईल.
नोटीसीवर कोणती भूमिका मांडणार?
आमदार संग्राम जगताप यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे आज, शनिवारी पुण्यात बोलताना जाहीर केले. अजित पवार यांच्या या भूमिकेवर जगताप यांनी कोणती प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. जनआक्रोश मोर्चाच्या समारोप सभेत ते याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.