सांगली : मिरजेतील मंगळवारपेठ चर्चसमोर असलेल्या सलून दुकानात बुधवारी दुपारी गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले.महात्मा गांधी चौकामधून मिरज मार्केटकडे जाणारा रस्ता शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून, या रस्त्यावर चर्चसमोर सलून दुकान आहे. बुधवारी दुपारी दोन गटांत जुन्या कारणातून वादावादी झाली. या वादात दुकानाची मोठ्या प्रमाणावर तोडफोडही करण्यात आली.
वाद सुरू असताना संशयिताकडून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नसली तरी गोळीबाराच्या घटनेने या परिसरात तणाव निर्माण झाला.वर्दळीच्या रस्त्यावर दिवसा गोळीबाराची घटना घडल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किरण रासकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी फिर्यादीच्यावतीने तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गिल्डा यांनी सांगितले. तक्रार दाखल झाल्यानंतर संशयितांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.