राहाता: गेल्या दोन हंगामामध्ये श्री गणेश सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला. यंदा ३ हजार रुपये उसास भाव देण्याची घोषणा ‘गणेश’चे मार्गदर्शक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली. मागील हंगामात ३ हजार भावातील शिल्लक २०० रुपये दीपावलीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. कामगारांना ११ टक्के बोनस देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुक्यातील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विवेक कोल्हे यांच्या हस्ते आणि ‘गणेश’चे अध्यक्ष सुधीर लहारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोल्हे बोलत होते. ज्येष्ठ माजी संचालक गंगाधर चौधरी, प्रभावती घोगरे, सुधीर म्हस्के, डॉ. एकनाथ गोंदकर, रघुनाथ गाडेकर, उपाध्यक्ष विजय दंडवते, संचालक, सभासद आदी उपस्थित होते.

कोल्हे यांनी सांगितले की, साखर कारखान्याचे आर्थिक गणित व्यवस्थित राहावे यासाठी उप-उत्पादनांची निर्मिती करणे आता गरजेचे आहे. त्यानुसार, श्री गणेश कारखाना यंदा आसवनी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करणार आहे. आसवनी ३०० दिवस सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कारखान्याने यंदा विक्रमी ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शेतकरी, कामगार आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले आहेत. कारखाना प्रगतिपथावर जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. कार्यक्षेत्रात अडीच लाख टन ऊस उभा आहे. बाहेरून दीड लाख टन ऊस आणून चार लाख टनाचे उच्चांकी गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याच्या वाटचालीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. गेल्या दोन हंगामामध्ये श्री गणेश सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला. यंदा ३ हजार रुपये उसास भाव देणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. मागील हंगामात ३ हजार भावातील शिल्लक २०० रुपये दीपावलीनिमित्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. कामगारांना ११ टक्के बोनस देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी वाटचालीचा आढावा घेतला. कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सचिव नितीन भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संचालक नानासाहेब नळे यांनी आभार मानले. संचालक महेंद्र व मनीषा गोर्डे, मधुकर व कल्पना सातव यांच्या हस्ते विधिवत बॉयलरचे पूजन करण्यात आले.