महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेखला पंजाबमधल्या शस्त्रास्त्रं तस्करी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. सिकंदर शेखच्या नावावर या आधी कोणताही गुन्हा नव्हता, तसेच तो देशाचा मोठा पैलवान असल्याची बाब लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला शुक्रवारी केलेल्या अटकेमुळं महाराष्ट्रातल्या कुस्ती वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी तिघांची पार्श्वभूमीवर ही गुन्हेगारी स्वरुपाची होती. दरम्यान हा जामीन मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
काय आहे सुप्रिया सुळेंची पोस्ट?
महाराष्ट्राचा मल्ल सिकंदर शेख यास जामीन मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान जी यांच्या संपर्कात होते. न्यायालयात आज सिकंदरची बाजू वकिलांनी अतिशय सक्षमपणे मांडली. अखेर त्याला आज जामीन मंजूर झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात परत येईल. या संपूर्ण प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्री महोदयांनी खुप सहकार्य केले याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच सिकंदरच्या वकिलांनी त्याची बाजू व्यवस्थितपणे मांडून त्याला जामीन मिळवून दिला, याबद्दल त्यांचेही मनापासून आभार.
इतर तीन आरोपींना जामीन नाही
सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली होती. पंजाब पोलिसांच्या पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करत चार जणांना अटक केली होती. त्यात सिकंदर शेखचाही समावेश होता. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ९९ हजार रुपये रोख रक्कम, पाच पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबमधील खरड येथील पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चार आरोपींपैकी सिकंदर शेखला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित तीन जणांचा जामीन नामंजूर करण्यात आला. त्या तीनही जणांवर या आधी खंडणी आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
