सोलापूर : सोलापूरजवळ हिरज येथील रेशीम पार्कमुळे जिल्ह्यात रेशीम लागवडीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येथे रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी दिले. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे कार्यरत असलेल्या रेशीम पार्कला मंत्री सावकारे यांनी भेट दिली. त्यांच्या समवेत आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते. या वेळी परिसरातील रेशीम उत्पादकांनीही सावकारे यांच्याशी संवाद साधला.
तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून हिरज येथे रेशीम पार्क उभारण्यात आले होते. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत असून, आसपासच्या परिसरात रेशीम लागवड वाढत आहे. परंतु उत्पादित रेशीमच्या विक्रीसाठी कर्नाटकातील बाजारपेठेवर अवलंबून राहावे लागते. त्याचा विचार करून सोलापुरात रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली. त्यास सावकारे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त उज्ज्वला पळसकर, रेशीम अधिकारी विनित पवार, भाजपचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष राम जाधव, बालाजी पवार आदी उपस्थित होते.