सोलापूर : नगर, धाराशिव भागात पडत असलेल्या मुसळधार पावासामुळे या भागातून सोलापूरला येणाऱ्या सीना नदीच्या पाणीपातळीत सध्या मोठी वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. सीना नदी नगर, धाराशिव भागातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या दोन्ही जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सीना नदीच्या पाणीपातळीत सध्या मोठी वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धाराशिवमधील परांडा येथून सीना नदी वाहते. तेथून बार्शी व करमाळामार्गे सोलापूर जिल्ह्यात येते. उत्तर, दक्षिण सोलापूर व मोहोळ तालुक्यात विविध बंधारे या नदीवर आहेत. पाकणी, शिंगोली, अकोले (मंद्रूप) व नंदूर येथील कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे आहेत. सध्या नदीत तब्बल ३० हजार क्युसेक्स इतका पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्याची पातळी विस्तीर्ण झाली आहे. हे सर्व बंधारे दुथडी भरून वाहात आहेत. सध्या या बंधाऱ्यावरून किंवा पुलावरून पाणी वाहताना कोणीही जाण्याचा प्रयत्न करू नये. विद्युत मोटारी काढायला जाऊ नये. तशा सतर्कतेच्या सूचना पाटबंधारे विभागाने दिले आहेत. सीना नदीच्या विस्तीर्ण पात्रामुळे आसपासच्या शेतामध्ये पाणी घुसले आहे. इतकेच नव्हे तर शेतशिवारात मातीही मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

तुळजापूरहून अक्कलकोटकडे जाणाऱ्या बोरी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात सकाळी ११ वाजता ३०० क्युसेक्स पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला होता. तो नंतर ६०० क्युसेक्सने वाढविण्यात आला. त्यामुळे नदीच्या पुलावरून कोणीही रस्ता ओलांडून जाऊ नये, अशा सतर्कतेच्या सूचना पाटबंधारे विभागाने देण्यात आल्या आहेत. वीर धरणातून नीरा नदीत संध्याकाळी १०७३६ क्युसेक एवढे पाणी सोडले जात होते. त्यामुळे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला पुन्हा एकदा सदृश्य पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या आठ दिवसांपासून मध्यम व किरकोळ स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली असून दररोज ४.५ मिलिमीटर एवढाच पाऊस पडत आहे. मात्र तरीही चालू ऑगस्टच्या आतापर्यंत ११८.७ नेहमी इतका पाऊस झाला आहे. चालू महिन्याची सरासरी ११०.४ मिमी इतकी आहे. चालू महिन्यात जेमतेम ११ दिवस पाऊस झाला आहे. सीना नदीचे पात्र असलेल्या उत्तर सोलापूर (१२६.७) दक्षिण सोलापूर (१८९.३) आणि बार्शी (२६०.३) येथे पाऊस झाला आहे.