सावंतवाडी: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे रन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड आणि घृणास्पद हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. हा हल्ला केवळ त्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेवरच नव्हे, तर देशातील न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला आघात असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
सरन्यायाधीश गवई हे भारतीय न्यायव्यवस्थेच्या सन्माननीय परंपरेचे प्रतीक आहेत. अशा उच्चपदस्थ न्यायाधीशांवर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय असून, तो न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला आणि निर्भयपणाला बाधा निर्माण करणारा आहे. या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेने एकमुखाने तीव्र निषेध करत दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.वकील संघटनेने शासन आणि पोलीस प्रशासनाकडे अशी विनंती केली आहे की मा. न्यायमूर्ती तसेच इतर न्यायाधीशांची सुरक्षा सुनिश्चित करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत. न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि तिच्यावर कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, असे संघटनेने स्पष्ट केले.
या निषेधावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर, महिला उपाध्यक्ष नीलिमा गावडे, सचिव ॲड. यतिश खानोलकर यांच्यासह जिल्हा सरकारी वकील ॲड. संदीप राणे, ॲड. सौ. उल्का पावसकर, ॲड. गौरव पडते, ॲड. श्री. अमोल सामंत, ॲड. नीता कविटकर, ॲड. श्री. बालाजी रणशूर, ॲड. श्री. अमोल कविटकर, ॲड. शाम सावंत, ॲड. शाम गोडकर, ॲड. श्री. अजित भणगे आणि बहुसंख्य वकील बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.