सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात गणेश चतुर्थीच्या काळात शेतकरी बांधवांसाठी विशेष महत्त्व असलेला ‘नवं सोहळा’ आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहात साजरा केला जातो. भातशेतीशी जोडलेली ही एक अनोखी प्रथा असून, यात पिकायला लागलेल्या भात रोपांची पूजा करून ती ग्रामदैवताला अर्पण केली जातात. विशेषतः ओटवणे आणि कलंबिस्त पंचक्रोशीत ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जात आहे. ओटवणे येथील श्री देव रवळनाथ मंदिर व कलंबिस्त येथील श्री देव लिंगेश्वर मंदीर मध्ये हा सोहळा संपन्न झाला.

​गणेश चतुर्थीच्या काळात गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. जून महिन्यात भात लावणी सुरू होते आणि गणेशोत्सवाच्या काळात पीक परिपक्व होण्यास सुरुवात होते. त्यामुळे भात कापणी सुरू करण्यापूर्वी, शेतकरी आपल्या श्रमाचे पहिले पीकं म्हणजेच भाताचे कोंब आपल्या आराध्य दैवताला आणि ग्रामदेवतेला अर्पण करतात.

​आज, गणेश चतुर्थीच्या काळात कलंबिस्त येथील श्री लिंगेश्वर मंदिरात आणि ओटवणे येथील श्री देव रवळनाथ मंदिर मध्ये हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला. सकाळी पूजाअर्चा करून गावातील मानकरी आणि ग्रामस्थ एकत्र आले. ढोल-ताशांच्या गजरात मंदिरापासून जवळ असलेल्या ‘चव्हाटा’ येथे या सोहळ्यासाठी खास आरक्षित केलेल्या वाफ्यात लावलेली भात रोपे काढण्यात आली. ही रोपे म्हणजे उगवायला लागलेल्या भाताचे ‘नवं’ होय.

​पारंपरिक विधीनुसार, प्रथम ही भात रोपे श्री मंदिरात देवाला दाखवून पूजा केली गेली. त्यानंतर मानकरींना ही रोपे प्रथम वाटली जातात. हा एक पवित्र प्रसाद मानला जातो. उपस्थित सर्व गावकऱ्यांमध्ये ही ‘नवं’ वाटली जातात. गावकरी ही भात रोपे देवाचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात आणि श्री गणेशाला अर्पण करून ती घराच्या उंबरठ्यावर किंवा दरवाज्यावर लावतात.

​यानंतर, शेतातून आणलेले भाताचे कोंब शिजवून त्याचा नैवेद्य श्री गणेश आणि कुलदैवताला दाखवला जातो. एकप्रकारे, शेतकरी आपल्या शेतीतल्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी देवाला वंदन करून आशीर्वाद घेतात. ही प्रथा केवळ एक धार्मिक विधी नसून, शेतकरी आणि निसर्गाचे नाते अधिक दृढ करणारी आहे.

​हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होणाऱ्या या सोहळ्याला लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी गर्दी केली होती. कलंबिस्त गावातील ही सैनिक परंपरा असलेली गाथा या ‘नव सोहळ्या’मुळे अधिक समृद्ध झाली आहे. हा सोहळा आध्यात्मिक अनुभूती देण्यासोबतच, नव्या पिढीला शेती आणि संस्कृतीच्या नात्याची जाणीव करून देत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेली ही परंपरा आजही त्याच भक्तीभावाने आणि उत्साहाने जोपासली जात आहे.