​सावंतवाडी : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी खुला झाला आहे, आणि किल्ल्यावर जाण्यासाठी होडी सेवाही पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्ती सुरू असल्यामुळे राजकोट किल्ला अजूनही बंद आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी होडी ची सुविधा आहे. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक, अभ्यासक येतात.

​जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचा पदपथ खचला होता. त्यामुळे पर्यटन हंगामातही पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश मिळत नव्हता, ज्यामुळे त्यांची निराशा होत होती.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. कोसळलेल्या पदपथाखाली पुन्हा मुरुम भरून त्यावर सोलिंग, पीसीसी (PCC), आणि आरसीसी (RCC) ग्रेड स्लॅबची कामे पूर्ण झाली आहेत. आजूबाजूच्या जांभ्या दगडांच्या पदपथांची पुनर्बांधणी आणि चबुतऱ्यावरील ग्रॅनाइटची दुरुस्तीही करण्यात आली आहे. जलनिस्सारण (ड्रेनेज) आणि इतर आवश्यक दुरुस्त्या आता अंतिम टप्प्यात आहेत.

​सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व दुरुस्ती झाल्यावर किल्ल्याची संरचनात्मक स्थिरता (Structure Audit) तपासली जाईल. तज्ञांकडून प्रमाणपत्र मिळाल्यावर ते सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले जाईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच हा किल्ला पर्यटकांसाठी खुला होईल. ​किल्ला कधी खुला होणार याबाबतची अधिकृत माहिती योग्य वेळी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली जाईल, असेही श्रीमती इंगवले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, लवकरच या ऐतिहासिक किल्ल्याचे सौंदर्य पुन्हा अनुभवता येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.