सावंतवाडी : यंदाच्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार मोठ्या संकटात सापडले आहेत. भात पीक, नारळ आणि पोफळीचे अतिवृष्टीमुळे झालेले मोठे नुकसान पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीतही कृषी विभाग केवळ कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानत असल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
पंचनाम्यांचा अभाव, भरपाईची चिंता:
अतिवृष्टी होऊनही अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न गेल्यामुळे नुकसानीची अचूक आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही. परिणामी, शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
हवामान बदलाचा पिकांवर परिणाम:
यंदाच्या हंगामात हवामान बदलामुळे आणि अतिवृष्टीमुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, हंगामपूर्व झालेल्या पावसामुळे पोफळी आणि नारळाचेही मोठे नुकसान झाले आहे. या हवामान बदलामुळे भविष्यात काजू, जांभूळ, आंबा, कोकम यांसारख्या फळझाडांचेही नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन करण्याची आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची नितांत गरज आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
’ई पीक’ नोंदणी रखडली, शासकीय लाभांना मुकावे लागणार:
एकीकडे नुकसानीने शेतकरी त्रस्त असताना, दुसरीकडे नेटवर्कच्या अभावामुळे ई पीक नोंदणीची प्रक्रिया रखडली आहे. ही नोंदणी शासकीय लाभांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने, नोंदणी न झाल्यास शेतकरी नुकसान भरपाई, भात हमीभावाने विकणे अशा अनेक शासकीय लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाच्या उदासीनतेवर शेतकऱ्यांचा संताप:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी अधिकारी सध्या उदासीनता दाखवत आहेत. कृषी अधिकारी ‘ए आय प्रशिक्षणाची’ गरज असल्याचे सांगत असले तरी, ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडचणींकडे आणि नुकसानीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी त्वरीत पंचनामे करण्याची आणि मार्गदर्शन करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाकडून तातडीने मदत मिळू शकेल.