सावंतवाडी: गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. गौरी गणपतीच्या आगमनानिमित्त शहरातील बाजारपेठेत लगबग वाढली आहे. सोमवार आणि मंगळवारी खरेदीसाठी अधिक गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

​श्री गणेश चतुर्थीचा सण बुधवार, २७ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या दिवशी घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल. या उत्सवासाठी घरातील रंगरंगोटी, विद्युत रोषणाई आणि माठीच्या सजावटीसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. गणपतीची मूर्ती विराजमान होणाऱ्या ‘माठी’चे सामान बाजारात दाखल झाले असून, त्याला चांगली मागणी आहे.

​गणपतीच्या आगमनापूर्वी ‘माठी’ सजवण्यासाठी विशेष तयारी केली जाते. यासाठी रानफुले, फळे आणि पारंपरिक वस्तूंचा वापर केला जातो. बाजारात या सजावटीसाठी कवडांळ, नारळ, काकडी, शेरवाडे, कांगळ, हरणं, आणि आंबा टाळ अशा विविध वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. या पारंपरिक वस्तूंनी सजवलेल्या माठीखाली बाप्पा विराजमान होतील.

​गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्येही कामाची लगबग वाढली आहे. रंगरंगोटी केलेली मूर्ती घरी नेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत आहेत. यंदा प्रचंड महागाई वाढली असली तरी, लोकांचा उत्साह कमी झालेला नाही. गोरगरीब जनतादेखील हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करताना दिसत आहे.

​एकंदरीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाचा माहोल तयार झाला असून, सर्वत्र आनंदी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, शहरभर उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.