मराठा आरक्षणाचा तिढा सुटावा, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं याकरता मनोज जरांगे पाटलांनी गेल्या १५ दिवसांपासून बसले आहेत. त्यांनी आता सरकारला एक महिन्याचा अवधी दिला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या या भूमिकेचं समर्थन होत असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबाही वाढत आहे. आता सकल मराठा समाजाने भोगावती नदीमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भोगावती नदीमध्ये सकल मराठा समाजाचे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. मोहोळ तालुक्यातील भोयरे, नरखेड गावाचे सकल मराठा समाजाचे बांधव हे आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या जलसमाधी आंदोलनामध्ये लहानांपासून वृद्ध मराठा आंदोलकांचा समावेश आहे.
“गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन केलं आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पंचक्रोशित सकल मराठा बांधवांनी आंदोलन करण्याचे ठरवले. मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा मिळावा म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, मराठा आरक्षणाची आंदोलनं सरकारने गांभीर्याने नाही घेतली तर आमचं आंदोलन उग्र होईल. नरखेड पंचायतच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने उभारली जातील”, असा इशारा मराठा आंदोलक गोविंद पाटील यांनी दिला आहे.
जरांगेंकडून सरकारला एक महिन्याचा अवधी
मनोज जरांगे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना म्हणाले, “मराठा समाजाने सरकारला ४० वर्ष दिली आहेत, आता एक महिना देऊ.” जरांगे पाटलांनी सर्व आंदोलकांना विचारलं की आपण या सरकारला एक महिना द्यायचा का? त्यावर सर्व आंदोलकांनी होकार दिला.
मनोज जरांगे आंदोलकाना म्हणाले, मी तुमचा सर्वांचा आहे, माझ्यावर कोणीही शंका घेऊ नका. समाजावर डाग लागू नये, समाजाला कोणीही बदनाम करू नये, सरकारला आपण वेळ दिला नाही म्हणून कोणी काही बोलू नये म्हणून मी दोन पावलं मागे जातोय. केवळ जातीसाठी दोन पावलं मागे जातोय. पण, एक महिन्यात आरक्षण मिळालं नाही तर ३१ व्या दिवशी मी परत आमरण उपोषण करेन. त्यानंतर सलाईन, पाणी घेणार नाही. मी उपोषण सोडायला तयार आहे पण ही जागा सोडायला तयार नाही. पुढचे ३० दिवस इथे (अंतरवाली सराटी) आपलं आंदोलन सुरूच राहील. ३१ व्या दिवशी आरक्षण नाही दिलं तर सगळ्या मंत्र्यांना महाराष्ट्राची सीमा ओलांडू देणार नाही.