नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारपासून (३० जाने.) अण्णा हजारे आंदोलन करणार होते. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. आज सुमारे तीन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भाजपाची शिष्टाई यशस्वी झाली आणि अण्णा हजारे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांवर आपण समाधानी असल्याचेही यावेळी अण्णा हजारे यांनी सांगितले.

अण्णा हजारे यांच्या मागणीनुसार एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अण्णा हजारे यांना निमंत्रित सदस्य म्हणून विशेष स्थान दिले जाणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये ही समिती निर्णय घेऊन कार्यवाही करणार आहे. याबरोबर अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि लोकायुक्त तसेच निवडणुक पद्धतींमध्ये सुचवलेल्या सुधारणा याबाबत केलेल्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली असून त्या मागण्याही लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत. आणि या चर्चेसाठी अण्णा हजारे यांना थेट दिल्लीला बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

देवेंद्र फडणवीस पुणे विमानतळावरून अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धीला रवाना झाले होते. जाण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला होता. त्यावेळी, अण्णा हजारे यांच्याशी गेले आठवडाभर चर्चा सुरूी असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर अखेर आज भाजपाला अण्णा हजारे यांची मनधरणी करण्यात यश आलं.