सोलापूर : माध्यमिक शालांत परीक्षेत सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९२.८३ टक्के इतका लागला आहे. यात नेहमीप्रमाणे मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारल्याचे दिसून आले. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ६४ हजार ४५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६३ हजार ८४९ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. त्यातील ५९ हजार २७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ३१ हजार ५ मुले (९०.०४ टक्के) आणि २८ हजार २७२ मुलींचा (९६.१० टक्के) समावेश आहे.
सोलापूर शहर, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर भागाचा विकाल ८८.८२ टक्के लागला आहे. यातील एकूण १९ हजार ८७९ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार २९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पंढरपूर तालुक्याचा निकाल ८९.८४ टक्के लागला असून यात ७०७१ पैकी ६५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक ९३.३४ टक्के निकाल सांगोला तालुक्याचा लागला. येथील ५०८४ विद्यार्थ्यांपैकी ४८५९ विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल (८१.०१ टक्के) अक्कलकोटच्या नावावर लागला आहे. तेथील ४१७२ विद्यार्थ्यांपैकी ३५४६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. बार्शी तालुक्यात ५५६० पैकी ५२४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ९२.७६ एवढी आहे.
माळशिरस तालुक्यातून ६७२५ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. त्यापैकी ६३५६ विद्यार्थी (९२.५६ टक्के) यशस्वी झाले आहेत. करमाळा (९१.१३ टक्के), मोहोळ (९०.९६ टक्के), माढा (९०.७६ टक्के) आणि मंगळवेढा (९०.७२ टक्के) याप्रमाणे अन्य तालुक्यांतील दहावी परीक्षा निकालाची स्थिती आहे.