सोलापूर : गेल्या मे महिन्याच्या पाठोपाठ सध्याच्या जून महिन्यात पडत असलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण झपाट्याने भरत आहे. धरणातील पाणीसाठ्याने पन्नाशी गाठली असून, येत्या तीन-चार दिवसांत साठीकडे वाटचाल ठेवली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे गेल्या २७ दिवसांत प्रथमच उजनी धरणात तब्बल ७३ टक्के पाणीकपात झाल्याचे दिसून येते. पुण्यातील बंडगार्डन येथून सोडण्यात आलेल्या पाण्याची आवक वाढली असून, तेथून दौंडमार्गे १४ हजार ५४५ क्युसेक विसर्गाने पाणी उजनी धरणात मिसळत आहे. त्यामुळे दौंड येथून धरणात येणारी पाण्याची आवक आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी उजनी धरणात एकूण ९०.८७ टीएमसी इतका पाणीसाठा होता. त्यात उपयुक्त पाणीसाठा २७.२१ टीएमसी आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ५०.७९ एवढी वाढल्याचे दिसून आले.
गेल्या मे महिन्याच्या प्रखर उन्हाळ्यात इतिहासात पहिल्यांदाच पडलेल्या प्रचंड पावसाचा बळावर धरणातील पाणीसाठा मृत पातळीवरून उपयुक्त पातळीवर पोहोचला आणि त्याही पुढे उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ५० पेक्षा जास्त झाली. गेल्या मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात धरणात २२.९६ टक्के मृत पाणीसाठा होता. तो पार करून नंतर उपयुक्त पाणीसाठा पन्नाशीच्या पुढे पोहोचला. म्हणजेच २२ मे पासून ते आज १७ जूनपर्यंत अवघ्या २७ दिवसांत धरणात एकूण ७३ टक्क्यांवर पाणीसाठा वधारला आहे.
उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. त्यात आणखी सहा टीएमसी अतिरिक्त पाणी साठवता येतो. म्हणजेच धरणात एकूण १२३ टीएमसी पाणीसाठवण करता येते. धरणातील एकूण उपयुक्त पाणीसाठा सुमारे ५४ टीएमसी तर मृत पाणीसाठा ६३ टीएमसी इतका मानला जातो. उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर उर्वरीत मृत पाणीसाठा काटकसरीने वापरावा लागतो. यात पिण्याच्या पाण्यासह शेती आणि नंतर उद्योग असे प्राधान्यक्रम निश्चित केले जाते.