सोलापूर : योग हा ध्यान आणि व्यायामासह अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या पैलूंची ओळख करून देणारे प्राचीन शास्त्र आहे. भारत देशाला लाभलेला समृद्ध वारसा कृतिशील जतन करण्याचा निर्धार सोलापुरात झालेल्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात करण्यात आला. शहर व जिल्ह्यात अनेक शासकीय, निमशासकीय संस्था व संघटनांसह नागरिकांनी योगासने करून या प्राचीन शास्त्राचे महत्त्व अधोरेखित केले. यानिमित्ताने योगमय वातावरण पाहायला मिळाले.
सकाळी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, सोलापूर योग समन्वय समिती आणि केंद्रीय संचार ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या योग दिन कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्यासह योग दिवस समन्वय समितीचे मनमोहन भुतडा, रोहिणी चपळाईकर, पतंजली योग पीठाच्या समन्वयक, भाजपच्या माजी नगरसेविका संगीता जाधव, केंद्रीय संचार ब्युरोचे अंबादास यादव आदींचा प्रामुख्याने सहभाग होता.
यावेळी मनमोहन भुतडा लिखित ‘सुखी जीवनाचा कानमंत्र’ या योग विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच योगगुरू स्पर्धेतील उमा झिंगाडे, रघुनाथ क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, विद्या व्हनमोरे आणि रवी कंटली यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याशिवाय निबंध स्पर्धेतील नर्मदा कनकी, स्मिता देशपांडे व मानसी मोकाशी यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सुरुवातीला शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस बँड पथकाने देशभक्तीपर गाणी योग संचलनाच्या वेळी संगीत धून वाजवून मंत्रमुग्ध केले.
या योग दिन कार्यक्रमात शहर व जिल्हा पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल गट क्र. १०, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना बटालियन, भारत स्काऊट गाईड, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, विवेकानंद केंद्र, गीता परिवार, सर्वोदय योग मंडळ, योग प्रभा मंडळ, पतंजली योगपीठ तसेच विविध शाळांचा सहभाग होता.