पंढरपूर : सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील सादुल पेट्रोल पंपासमोरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली पाणी निचरा होणारी कमी व्यासाची पाईपलाईन आहे. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले व त्यातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तरी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्या समवेत चर्चा करून यातून मार्ग काढावा, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

सोलापूर शहरात बुधवारी मध्यरात्री अतिवृष्टी झाली, त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक भागांत पाणी साचले. या संदर्भात सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आयोजित सर्व विभागांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील कुंभार, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, अमित निमकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास नवले यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर शहरातून जाणाऱ्या सर्व महामार्गाच्या अनुषंगाने पाहणी करावी व पावसाचे पाणी महामार्गामुळे कोठेही अडणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. तसेच जिल्हाधिकारी यांनी महापालिका आयुक्त व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून उड्डाणपुलाच्या खालील पुलातून पाण्याचा निचरा प्रणाली व्यवस्थित करणे व भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी उपाययोजना सुचवाव्यात. या भागात पाणी साचल्यामुळे झालेल्या नुकसानीला राष्ट्रीय महामार्गच जबाबदार असल्याने याची गंभीर दखल घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले तसेच शहराच्या विविध भागांत स्वच्छतेची पाहणी केली व अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमधील वज्रेश्वर नगर, नीलम नगर व नवलेनगर भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

तसेच सादुल पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलाच्या खालील पुलाखालून पाणी न गेल्याने झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली. सोलापूर शहराच्या स्वच्छतेबाबत महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.