सोलापूर : एका ४५ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्यानंतर पीडितेने स्टिंग ऑपरेशन करून बनविलेली चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष, माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, सपाटे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेऊन सपाटे यांना अटक करण्याची आणि त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेत पाच वेळा निवडून आलेले, स्थायी समिती सभापतिपद आणि महापौरपद भोगलेले मनोहर गणपत सपाटे (वय ७०) यांच्या हॉटेलमध्ये उतरलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विनयभंग केल्यानंतर गुन्ह्याचा पुरावा म्हणून पीडितेने सपाटे यांची छुप्या पद्धतीने चित्रफीत तयार केली. त्यातील काही भाग समाजमाध्यमावर प्रसारित झाला आहे. दरम्यान, सपाटे यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका खोलीत घडलेल्या विनयभंगाच्या घटनेची संपूर्ण चित्रफीत, पेन ड्राइव्ह, तसेच पीडितेचा मोबाइल आणि हॉटेलच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे.
सपाटे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी अपेक्षित आहे. दुसरीकडे पुढील तपासासाठी पोलिसांनी पीडितेचा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेश श्रेष्ठींनी गंभीर दखल घेऊन याबाबतचा अहवाल पाठविण्याचा आदेश शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना दिला होता. अहवाल पाठविल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सपाटे यांना पक्षातून निलंबित केल्याचे खरटमल यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सपाटे यांना तातडीने अटक करून तपासाअंती तडीपार करण्याची मागणी केली.
राजकीय षड्यंत्र
आपल्यावर झालेला विनयभंगाचा आरोप खोटा आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारणातून संपविण्यासाठी आपल्याविरुद्ध हितशत्रूंनी षड्यंत्र रचले आहे. – मनोहर सपाटे, माजी महापौर.