सोलापूर : नुकत्याच झालेल्या एका सार्वजनिक उत्सवाच्या मिरवणुकीत ध्वनिवर्धकांच्या भिंतींनी घरातील ८० वर्षांच्या वृद्ध आणि आजारी आईला त्रास होत असल्याने ध्वनिवर्धकाचा आवाज कमी करा, अशी विनंती करणा-या एका व्यक्तीला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ध्वनिवर्धकांजवळच सक्तीने थांबवून ठेवले. त्यामुळे त्या व्यक्तीला कायमचा बहिरेपणा उद्भवला. त्यास यापुढे श्रवणयंत्राशिवाय ऐकायला येणार नाही. याबाबत संबंधित व्यक्तीने धाडस दाखवून संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

शहरात देगाव रस्त्यावरील कोयनानगर-शेरखाने वस्तीजवळ हा प्रकार घडला. याबाबत राजू दत्तू यादगिरीकर (वय ५७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सलगर वस्ती पोलीस ठाण्यात बीजी ग्रुप नावाच्या मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे.

राजू यादगिरीकर हे देगाव रस्त्यावर कोयनानगर परिसरात पत्नी भारती आणि ८० वर्षांची वृध्द आणि आजारी असलेल्या आईसह राहतात. त्यांच्या घरासमोरील रस्त्यावरून निघालेल्या उत्सव मंडळाच्या मिरवणुकीत कर्णकर्कश आवाजात ध्वनिवर्धकांच्या भिंती आणल्या होत्या. त्याचा प्रचंड त्रास आजारी वृध्द आईला होऊ लागल्याने ध्वनिवर्धकांचा आवाज कमी करावा म्हणून विनंतीवजा सांगण्यासाठी यादगिरीकर हे त्या मिरवणुकीत गेले होते. परंतु त्यांची विनंती धुडकावून उलट उन्मादी पध्दतीने त्यांना ध्वनिवर्धकांच्या भिंतीसमोरच सक्तीने थांबवून ठेवण्यात आले. रात्री ते घरी परतले असता त्यांना काहीच ऐकू येईना. म्हणून त्यांनी पत्नी भारतीसह तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेले. तपासणीअंती ध्वनीवर्धकांच्या प्रचंड दणदणाटी आवाजाने यादगिरीकर यांच्या कानाच्या नसा कमकुवत झाल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी बहिरेपणा आला आहे. यापुढे त्यांना श्रवणयंत्राशिवाय ऐकायला येणार नाही. या प्रकारामुळे हादरलेल्या यादगिरीकर यांनी धाडस दाखवून थेट पोलिसांकडे धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्सवांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात वरचेवर नवनव्या सार्वजनिक उत्सवांची भर पडत असल्यामुळे प्रत्येक उत्सवाच्या मिरवणुकीत ध्वनिवर्धकांच्या भिंतीची सोलापूरकरांना चांगलीच भीती वाटू लागली आहे.