पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश परिस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अंदाजापलीकडे पाऊस पडला आणि शेतीचे नुकसान झाल्याचे गोरे म्हणाले. उद्या (मंगळवारी) मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत ओला दुष्काळाबाबत मी माहिती देणार आहे. मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल, असे गोरे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक तैनात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या शिवाय पूरस्थिती निर्माण झाली, तर बाधितांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना पण दिल्या आहेत. जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेट दिली. शेतशिवार, बांधावर गेलो. परिस्थिती काही ठिकाणी गंभीर दिसून आली. पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अनेक शेतांत पाणी साचले आहे. त्यामुळे पंचनाम्यात अडथळे येत आहेत. प्रत्यक्ष पंचनामे झाल्यावर नुकसानीचा अंदाज येईल, असेही त्यांनी सांगितले. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पालकमंत्री गोरे यांनी विश्वास दिला.