पंढरपूर : स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनांचा आढावा घेता त्यामधील प्रेरणास्थाने शोधून त्यातून बोध घेतल्यामुळेच आपल्याला समृद्ध भारताची उभारणी करणे आणि नव्या दमाने विकास घडविणे शक्य झाले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील म्हणाले. ते शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग तथा सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वंदे मातरम्’ गीताच्या सार्थ शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
सोलापूर येथील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व राणी कित्तूर चेन्नम्मा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सदरच्या कार्यक्रमाचे सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर रणधीर सतीश, कोषागार अधिकारी वैभव राऊत, आयटीआयचे प्राचार्य मनोज बिडकर, कर्मचारी, अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोलापूर येथील होम मैदान येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील होते. प्रसाद जिरांकलगीकर यांनी पाच कडव्यांचे संपूर्ण वंदे मातरम् गीत सादर केले व त्यांच्या सुरात सूर मिसळून उपस्थित सुमारे साडेसहा हजार जणांनी हे गीत गाऊन वातावरण राष्ट्रभक्तीमय केले.
प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज बिडकर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सोलापूर शहर व परिसरातील विविध ४५ शाळा, महाविद्यालय येथील प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यासोबतच शासकीय तथा निमशासकीय कार्यालय येथील कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर दुसरीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सामूहिक गीतगायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले, ‘वंदे मातरम्’ हे केवळ गीत नसून, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणेचा अमर स्रोत आहे. यामुळे देशभक्ती, आत्मसन्मान आणि एकात्मतेची भावना दृढ होते. आजच्या पिढीने या गीतामागील इतिहास जाणून घेणे आणि त्यातील देशप्रेम जपणे अत्यंत आवश्यक आहे.
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, तसेच परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे उपस्थित होते.
