लोकसत्ता वार्ताहर

कर्जत : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सबसिडी वर दिलेले सौर पंप दोन दिवसातच बंद पडल्याने ते दुरुस्तीसाठी कंपनीचे प्रतिनिधी आले नाहीत यामुळे मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे पिके जळाली आहेत. हे पंप जर दोन दिवसांत दुरुस्त केले नाही तर सहज सोलर कंपनी विरोधात नुकसानभरपाई ची तक्रार ग्राहक मंचात करण्याचा इशारा शेतकऱ्यांकडून दिला आहे.

महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांना दिवसा विज मिळावी यासाठी सौर पंप बसवण्यासाठी प्रवृत केले आहे. हे सौर पंप घेताना देखील चिरीमिरी दिल्याशिवाय मिळत नाहीत. मिळाले तर सदर कंपन्या या सौर पंप बसवून एकदा पाणी काढून फोटो काढून मोकळे होतात. परंतु त्यानंतर यात काही घोटाळा झाला तर दुरुस्तीला कंपनीचा कोणीही येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘भिक नको पण कुत्रे आवर’ अशी झाली आहे.

मिरजगाव येथे सुधीर आखाडे व काशिनाथ क्षिरसागर यांनी सहज कंपनीचे सोलर पंप नोव्हेंबर २०२४ महिन्यात बसवलेले आहे. पंप बसवल्यानंतर दोन तास पंप चालला परंतू त्यानंतर पंप बंद पडला. याबाबत सहज कंपनीकडे संपर्क साधून पंप बंद पडल्याची शेतकऱ्यांनी वेळोवेळी कल्पना दिली. परंतू गेली दोन अडीच महिने झाले तरी कंपनीने या शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. तसेच सोलर पॅनल बरोबर रोटो सोल कंपनीचा कंट्रोल आलेला आहे या कंपनीच्या रोटो सोल कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर मोबाईल द्वारे संपर्क साधून या कंपनीलाही कंट्रोल बंद असल्याचे वेळोवेळी सांगितले. परंतू सहज कंपनी व रोटो सोल कंपनीने शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेली दोन ते अडीच महिने पंप बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची नुकसान झालेले आहे. तरी या गोष्टी जबाबदार असणाऱ्या संबंधित कंपनीवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी काशिनाथ क्षिरसागर, सुधाकर आखाडे मिरजगाव, मदनराव वडवकर डिकसळ , यांनी केली असून जर आठ दिवसात सोलर पंप दुरुस्त केले नाही तर या कंपन्या विरोधात ग्राहक मंचात नुकसानभरपाईची तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.