Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक यामध्ये सहभागी झाले आहेत.हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

तसेच चार दिवसांत मुंबईतील अनेक भागात आंदोलकांनी रास्ता रोको केल्याचे प्रकार घडले. आंदोलनाला दिलेल्या परवानगीचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. दरम्यान, त्यानंतर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने काही महत्वाचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या काही महत्वाच्या निर्देशानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत मराठा आंदोलकांना भावनिक आवाहन केलं आहे.

आंदोलकांपैकी कोणी रस्त्यावर थांबलं असेल तर तातडीने मैदानावर जाऊन थांबण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. तसेच यावेळी मनोज जरांगे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ‘आमच्यात घुसून कोणीतरी षडयंत्र करत आहे’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

“मी न्यायदेवतेचं मनापासून कौतुक करतो आणि जाहीरपणे सांगतो, माझं हे शेवटचं सांगणं आहे. आंदोलकांच्या ज्या गाड्या रस्त्यावर आहेत त्या तुम्ही तातडीने मैदानात नेहून लावा. तुम्ही देखील मैदानात थांबा. जर तुम्हाला आरक्षण हवं नसेल आणि तुम्हाला कोणाचं ऐकून गोंधळ करायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावी जाऊ शकता. मला आता पाणी पिऊन बोलावं लागत आहे. मग तुम्ही ठरवा की मला किती वेदना होत असतील. फक्त तुमच्यासाठी मी एवढे कष्ट सहन करत आहे”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे.

“मी समाजाचा अपमान होईल असं कधीही वागत नाही. मला जर पाणी पिऊन तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काहीही उपयोग नाही. मुंबईकरांना त्रास होईल असं कोणीही वागू नका. मला वाटतं की अंतरवाली सराटीत पण हेच पोरं होते. पत्रकार देखील होते. मात्र, कधीही कोणाला त्रास दिल्याचं ऐकायला आलं नव्हतं. पण मुंबईत त्रास दिल्याचं ऐकायला येतंय. त्यामुळे आमचा संशय बळावतोय. आमच्यात घुसून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. कोणीतरी षडयंत्र करत आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.