Somnath Suryawanshi Custodial Death : परभणी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची कथित विटंबना करण्यात आली होती. यानंतर परभणीत हिंसाचार झाला होता. या घटनेनंतर परभणी पोलिसांनी अटक केलेल्या ५० जणांपैकी मृत सोमनाथ सूर्यवंशी एक होता. सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूनंतर त्याला न्याय मिळावा अशी मागणी राज्यभरातून होत आहे. सोमनाथची आई विजयाबाई सुर्यवंशी यांनी, त्यांचा मुलगा सोमनाथचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे व्हायचे स्वप्न होते, असे सांगितले.

काय म्हणाली सोमनाथची आई?

विजयाबाई सुर्यवंशी यांनी त्यांचा मुलगा सोमनाथ पुस्तकप्रेमी होता असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, “त्याचे एकमेव भांडवल म्हणजे त्याची पुस्तके होती. त्याच्याकडे अशी शेकडो पुस्तके होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही काम केले आहे, त्याच्या एक टक्के तरी काम आपण करावे अशी सोमनाथची इच्छा होती.”

काम आणि शिक्षणाचा शोध

सोमनाथ सुर्यवंशीचा भाऊ प्रेमनाथ त्याची आठवण सांगताना म्हणाला, “सोमनाथला, त्याचे आणि इतरांचे आयुष्य सुधरवायचे असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याचे वाटायचे. तो म्हणायचा की, तुम्ही जिथे जाल तिथे काम आणि शिक्षण कुठे मिळते हे शोधा.”

सोमनाथचा भाऊ पुढे म्हणाला की, “सोमनाथ स्वत: तो जे काही बोलायचा त्याप्रमाणे जगायचा. शिक्षणाबरोबरच उदरनिर्वाहासाठी तो औरंगाबाद, लातूर, परभणी आणि पुणे या शहरांमध्ये फिरायचा. वकील झाल्यानंतर सोमनाथला गरजूंना मोफत कायदेशीर मदत करायची होती.”

मुलाच्या मृत्यूची जाबबदारी घेणार का?

सोमनाथच्या मृत्युमुळे आणखी हिंसाचार उसळेल या भितीने पोलिसांनी त्याचा मृतदेह परभणीला नेण्यास मनाई केली होती. पोलीस सोमनाथची आई विजयाबाई यांना म्हणाले होते की, “जर परिस्थिती आणखी चिघळली तर तुम्ही याची जबाबदारी घेणार का?” यावर विजयाबाईंनी पोलिसांना, “तुम्ही माझ्या मुलाच्या मृत्यूची जाबबदारी घेणार आहात का?” असा सवाल केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला माझा मुलगा पाहिजे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सोमनाथ सुर्यवंशी याच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. ही मदत स्वीकारण्यास सोमनाथच्या आईने नकार दिला आहे. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांचे बोलणे मला मान्य नाही. माझ्या मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतला. यासाठी मला न्याय पाहिजे. मंत्र्यांच्या आश्वासनांवर माझा विश्वास नाहीय. मला १० लाख रुपये नको. ते १० लाख रुपये मंत्र्यांच्या खिशातच ठेवा. नाहीतर कोणत्या तरी पोलिसाला खाऊ घाला. नाश्ता करायला द्या. मारायला ताकद येते. मला माझा मुलगा पाहिजे.”