पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सव पाठोपाठ आता नवरात्र उत्सवात देखील मोठ्या आवाजाच्या भिंती वापरण्यास बंदीचे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. उद्यापासून (सोमवार) ते ७ ऑक्टोबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात आवाजाच्या भिंतींसह प्रखर प्रकाशझोत अर्थात लेझर लाईटच्या वापरास बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मिरवणुका, गरबा, दांडिया या कार्यक्रमात याचा वापर करू नये, अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्यापासून ७ ऑक्टोबरपर्यंत शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गणेश उत्सवाप्रमाणे आणि नागरिकांना सुखावह होतील, असे आदेश पारित केले आहेत. नवरात्र उत्सवात आयोजित कार्यक्रम, मिरवणुकीमध्ये बघण्याकरिता आलेल्या भाविकांना आवाजाच्या भिंती व प्रखर विद्युतझोताचा त्रास होण्याची शक्यता आहे. यामुळे काही व्यक्तींना कानाचा, छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जीवितास धोका निर्माण झाल्याची घटना घडल्या आहेत. तसेच प्रखर प्रकाशझोत डोळ्यावर पडल्यावर काही वयोवृद्ध ,लहान मुलांच्या डोळ्याच्या पडद्याला तसेच बुबुळाला इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत नागरिकांनी कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक शक्तीदेवी मंडळाकडून मोठ्या प्रमाणत मिरवणुकीचे आयोजन केले जाते. सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ व गरबा, दांडिया आयोजक व संयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये, मिरवणुकीमध्ये आवाजाच्या भिंती आणि प्रखर विद्युत झोताच्या वापरास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३चे कलम १६३ (१ ) अन्वये, प्राप्त अधिकारानुसार आदेश पारित केले आहेत. एखाद्या व्यक्तीला विविक्षित कृती करण्यापासून परावृत्त राहण्याचा अथवा मानवी जीविताला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्याचा संभव आहे, असे जिल्हा दंडाधिकारी यांना वाटते. या बाबतचे एक परिपत्रकाद्वारे त्यांनी आदेश पारित केले आहेत. दरम्यान, गणेश उत्सवातील मिरवणुका या आवाजाच्या भिंतीमुक्त करण्यास गणेश मंडळाच्या सहकार्याने यशस्वी झाले होते.