सावंतवाडी : नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रात अधिकृतपणे प्रवेश केला असून, दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा मान्सूनने पूर्णतः व्यापला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने देवगडपर्यंत मजल मारली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत.
आज, २५ मे रोजी नैऋत्य मान्सून पश्चिममध्य आणि पूर्वमध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, कर्नाटकच्या काही भागांमध्ये, संपूर्ण गोव्यात, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये तसेच मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागांमध्ये पुढे सरकला आहे, असे ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे कुडाळ यांनी म्हटले पुढील तीन दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये, कर्नाटकसह बंगळूरु, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे कुडाळ यांनी म्हटले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज एकूण १२७.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, आजचा सरासरी पाऊस १५.९ मिमी इतका आहे. मान्सूनच्या या दमदार आगमनामुळे जिल्ह्यातील शेतीच्या कामांना गती येणार आहे.