नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे व्यथित झाले होते. त्यावरुन त्यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची बातमी समोर येत आहे. मात्र या बातमीची खातरजमा झालेली नाही. स्वतः बाळासाहेब थोरात यांनी याबद्दल काहीही सांगितले नसले तरी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे नाना पटोले यांनी राजीनाम्याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक पदवीधर निवडणुकीचा अर्ज भरण्यापासून ते निकाल लागेपर्यंत बाळासाहेब थोरात हे शांत होते. विरोधक आणि स्वपक्षातील अनेक नेत्यांनी त्यांचे नाव घेऊन राजकीय विधानं केली, मात्र बाळासाहेब कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्परसिंगद्वारे त्यांची भूमिका मांडली. त्यावेळी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून माझे म्हणणे मांडले असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र पक्षश्रेष्ठींनी हा राजीनामा स्वीकारलेला नाही, असेही सांगण्यात येत आहे.

हे वाचा >> बाळासाहेब थोरात यांना भाजपामध्ये प्रवेश देणार का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आम्ही पक्ष वाढविण्यासाठी…”

विधीमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा कुठे देतात?

महाराष्ट्र विधीमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला बोलताना सांगितले की, विधीमंडळ पक्षनेत्याची निवड ही पक्षाने केलेली असते. त्यामुळे त्या पदाचा राजीनामा द्यायचा झाल्यास पक्षाचीच परवानगी घेणे आवश्यक आहे. अर्थातच पक्षश्रेष्ठींकडेच याबाबत चर्चा करता येते. जर थोरात यांना हायकमांडशी बोलायचे असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. प्रदेशमधील नेत्यांशी बोलले पाहीजे, असे काही नाही.

थोरात यांच्या राजीनाम्याविषयी मला माहीती नाही – नाना पटोले

आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो अशा मी सदिच्छा देतो. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचा, तर त्यांनी राजीनामा दिलेला नाही.

हे वाचा >> बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिल्याची चर्चा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “त्यांचा आणखी राजकीय…”

काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न – आदित्य ठाकरे

बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. थोरात यांचा आज वाढदविस आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. काँग्रेसच्या अंतर्गत प्रश्नामुळे महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे काम उत्तमरित्या सुरु आहे.

हे वाचा >> “मी असलं घाणेरडं राजकारण कधीही…”, बाळासाहेब थोरात प्रकरणावर नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया!

थोरात भाजपामध्ये येण्याची शक्यता नाही – बावनकुळे

“आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम; आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो. जर भाजपात प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देत असतो. पण बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता मला वाटत नाही. बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले होते. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही”, अशी स्पष्टोक्ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speculations of congress leader balasaheb thorat resign assembly leader position kvg
First published on: 07-02-2023 at 11:05 IST