अलिबाग– माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे वाढते फसवणुकीचे प्रकार रोखण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या या आवाहनाला माथेरानकरांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.

माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांची दस्तुरी नाका येथे घोळका करून उभ्या राहणाऱ्या अश्वचालक, कुली, एजंट यांच्याकडून दिशाभूल केली जाते. त्यांची चुकीची माहिती देऊन फसवणूक केली जात असल्याचे समोर आले होते. येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक रोखा अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरानच्या प्रशासकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मंगळवार पासून माथेरान बेमुदत बंदची हाक दिली होती. संघर्ष समितीच्या या मागणीला माथेरानकरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

माथेरान व्यापारी संघटना हॉटेल असोसिएशन, राजकीय पक्ष, ई रिक्षा संघटना, विवीध सामाजिक संघटनांनी या बंदला पाठींबा दिला. त्यामुळे मंगळवारी माथेरानची बाजारपेठ, हॉटेल्स, हातरिक्षा, ई रिक्षा शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. पर्यटकांची वर्दळही कुठच दिसून येत नव्हती. दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर माथेरान मध्ये वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान बंदवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला कर्जतचे प्रांताधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. कर्जतच्या तहसिलदारांनी विवीध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, तसेच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.

माथेरान जागतिक किर्तीचे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. अशा फसवणूकीच्या प्रकारांमुळे माथेरानची बदनामी होत आहे. ज्याचे दूरगामी परिणाम माथेरानला आगामी काळात भोगावे लागू शकणार आहे. त्यामुळे हे प्रकार थांबवणे गरजेचे आहे.  –अजय सावंत , माजी नगराध्यक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माथेरानचे अर्थकारण इथे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांची फसवणूक, दिशाभूल होत असेल तर प्रशासनाने त्यात हस्तक्षेप करायला हवा, यासंदर्भात निवेदन देऊन देखील,  प्रशासनाने काहीच पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे टोकाचा निर्णय घ्यावा लागला.  मनोज खेडकर, समन्वयक, माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती