सांगली : अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री होईपर्यंत आपण स्वस्थ बसायचे नाही, आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत जमेल तिथे युती, जिथं जमणार नाही तिथं स्वबळावर अशा निवडणुका लढवायच्या, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आटपाडी येथे बोलताना केले.
आटपाडी येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये श्री. पाटील यांनी युवकांना विधायक दृष्टी देण्यासाठी संदेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, आटपाडीचा दुष्काळी कलंक आता पुसला जात आहे. अशा स्थितीत येथील युवक नव्या दमाने राजकारणातही सक्रिय होत आहे. या तरुणांना दिशा देण्याचे काम उपमुख्यमंत्री पवार यांच्या नेतृत्वाखाली होत आहे, असे संगितले.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, तरुणांच्या शक्तीचा वापर पक्ष वाढीसाठी झाला पाहिजे. मात्र, आपला पक्ष केवळ राजकारण न करता समाजकारणालाही तेवढेच महत्त्व देत आला आहे.कोणताही पक्ष आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, हे स्वप्न पाहत असतो. यात वेगळं असे काहीच नाही. यामुळे पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून आमचे नेते अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा बाळगणे गैर नाहीच. पक्षाचे नेते अजितदादा पवार मुख्यमंत्री होईपर्यत आता आपण स्वस्थ बसायचे नाही, हा संकल्प या मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व जण करूया.
येत्या काही महिन्यांत महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत ज्या ठिकाणी युती होईल तिथे युती म्हणून आणि ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील, त्या ठिकाणी स्वबळावर लढती, हा पर्याय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेतला जाईल. यामुळे कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागले पाहिजे.
महापालिका, जिल्हा परिषदेवर महायुतीचा अथवा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला पाहिजे. निवडणुकी दरम्यान फक्त महायुतीत असलेल्या तिन्ही पक्षांवर, म्हणजे एकमेकांवर टीका करायची नाही आणि आगामी निवडणूक मध्ये महायुतीचा झेंडा कसा फडकेल आणि त्यातल्या त्यात आपल्या राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेल, हा विचार करायचा, असे मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले.
आमच्या पक्षाची विचारधारा फुले, शाहू, आंबेडकर यांच्या आदर्शावर आहे. पुरोगामी विचार घेऊनच आमचे नेते राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्यानेच मी अल्पसंख्याक असूनही गेली २२ वर्षे मंत्रिमंडळात कार्यरत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.