अहिल्यानगर : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर महापालिकेसह जिल्ह्यातील ११ नगर परिषदा व एका नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम सोमवारी जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर ३ सप्टेंबरला महानगरपालिकेची, तर १८ ऑगस्टला नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभाग रचना कार्यक्रम किमान दीड महिने लांबणीवर पडला आहे. पर्यायाने निवडणूकही काही दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे. सुधारित वेळापत्रकानुसार हरकती व सुनावणी होऊन ९ ते १३ ऑक्टोबर दरम्यान महापालिकेची, तर २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नगरविकास विभागाने यापूर्वी १२ जूनला प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अहिल्यानगर महापालिका व जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायतीसह कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर, राहता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदे, शेवगाव, जामखेड या नगरपालिकांची निवडणूक रखडलेली आहे. त्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात आता बदल करण्यात आला आहे. त्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
त्यानुसार महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे – ३ सप्टेंबर, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती – ८ सप्टेंबरपर्यंत, प्राप्त हरकतींवर सुनावणी – ९ ते १८ सप्टेंबर, अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे – ९ ते १३ ऑक्टोबर. असा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तर नगरपंचायत व नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे – १८ ऑगस्ट, प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती – २१ ऑगस्टपर्यंत, प्राप्त हरकतींवर सुनावणी – २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर, अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणे – २६ ते ३० सप्टेंबर असा कार्यक्रम असणार आहे.राज्य शासनाने मात्र अद्यापही प्रभागाच्या आरक्षण सोडतीच्या सूचना दिलेल्या नाहीत.