सांगली : सजृनशीलतेची प्रतिके असलेली कातळशिल्पे वाळवा तालुक्यातील विविध भागात आढळत असून अशाच पध्दतीची कातळशिल्पे मानवी उत्क्रांतीमधील महत्वाचा टप्पा मानली जात आहेत.सचिन भगवान पाटील हे युवा संशोधक या काताळशिल्पाबरोबरच चक्रव्यूहांचा अभ्यास करत आहेत.पुण्यातील डेक्कन कॉलेज संशोधन संस्थेत पीएचडीचा अभ्यास करत असलेले पाटील कुरळप (ता. वाळवा) येथील आहेत. त्यांनी जिल्ह्यातील येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन डोंगर, इटकरे, वशी, शिवपुरी, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, डोंगरवाडी, नेर्ले, भाटवडे, कापरी या परिसरात काही महत्वपूर्ण अशी ठिकाणे शोधली आहेत. नजीकच्या काळात हे संशोधन अभ्यासासाठी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातूनच प्राचीन काळापासून मानवाचा वावर वाळवे तालुक्यातील डोंगर रांगेत असलेबाबतचे संशोधनातून पुढे येत आहे. मल्लिकार्जुन डोंगर ते कापरी आणि डोंगरवाडी ते सुळकीचा डोंगर या पर्वतमालेत काळ्या कातळावर आढळणारी कोरीव चिन्हे म्हणजे मानवी उत्क्रांतीतील या पाऊलखुणा आहेत.

येडेनिपाणी येथील मल्लिकार्जून मंदिराच्या पश्चिम बाजूस ठिकठिकाणी कातळावर चिन्हे कोरली आहेत. महामार्गाच्या पश्चिमेस तुकाई डोंगरात महादेव मंदिराजवळ कोरीव काम आढळते. वशी व डोंगरवाडी येथील डोंगराच्या सपाटी भागात अशाच प्रकारची शिल्पे आहेत. रिंग असलेले कपमार्क, जोडलेले कपमार्क, शेपटी असणारे कपमार्क, एक केंद्रीत वर्तुळे, त्रिकोन तसेच सृजनेंद्रीयांच्या आकाराच्या खुणा आढळतात. संशोधकांच्या मते हा प्राचीन मानव सखल भागातील शिकार करुन सुरक्षिततेसाठी उंचवट्यावरील सपाटी भागात येत असावेत. शेजारील परिसरातील निसर्ग निर्मित गुहा वास्तव्यासाठी सुरक्षित असल्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त वावर याच ठिकाणी असण्याची शक्यता आहे.

या कालावाधीत काळ्या खडकावर दगडाच्याच अनुकुचीदार हत्याराने संवादासाठी किंवा प्राचीन मानवांना व्यक्त होण्यासाठी अश्या प्रकारची चिन्हे कोरली असावीत असे मत या कातळल्शिल्पांचे पुरातत्व अभ्यासक श्री. पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले अशा प्रकारची चिन्हे बनवण्याचे विविध प्रयोजने असू शकतात तसेच या चिन्हाची बनावट व त्याच्या निर्मितीचा कालखंड सुद्धा मोठा असू शकतो. या चिन्हाचा वापर आकाश निरिक्षण, तारे निरीक्षण, कालमापन, हवामान, जन्म-मृत्यु नोंद, ऋुतु, पाऊस, पाणीसाठा अशा बाबींशी निगडीत असू शकतो. सांगली जिल्ह्यात अशा प्रकारची काळ्या कातळावर कोरलेली कातळशिल्पे या परिसरातच आढळतात. यावरुन उत्क्रांतीतील मानव सांगली जिल्ह्यातील वारणा-कृष्णा नदीपात्रास विभागणार्‍या मल्लिकार्जुन डोंगररांगेच्या परिसरात वास्तव्याला होता हे निरीक्षण दृढ होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पूर्वी डेक्कन कॉलेज पुणे येथील अभ्यासक डॉ रघुनाथ पपू यांचे संशोधानातून वाळवा, डिग्रज, हरिपूर या परिसरात अश्मयुगीन मानवाची वापरातील हत्यारे त्यांच्या संशोधनपर अभ्यासातून नोंदवण्यात आली आहेत. तसेच इतिहास पूर्व कालखंडातील इंडो रोमन व्यापाराच्या पाऊलखुणा म्हणून ओळखली जाणारी दगडी चक्रव्यूह हि शिवपुरी, ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, वशी (ता. वाळवा) तर मळणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे पाटील यांनी नोंदवली आहेत. याच परिसरात रोमन व्यापार्‍यांनी कोकणातून प्रवेश केला व व्यापारासाठी घाटमाथ्यावरील व्यापारी पेठमध्ये विस्तार केला असल्याचे लक्षात येते.