scorecardresearch

“राज्यात नवी संस्कृती…”, अजित पवारांचं फडणवीसांना आवाहन, म्हणाले, “भुजबळ, मलिक, मुश्रीफांच्या कुटुंबीयांवर…”

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेच्या अधिवेशनावेळी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला.

ajit pawar
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांना राज्यात नवी संस्कृती रुजवण्याचं आवाहन केलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केले. तसेच राज्यातलं सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला. यासाठी तपास यंत्रणांना विरोधी पक्षातील लोकांच्या मागे लावलं जात आहे, असं पवार म्हणले.

अजित पवार म्हणाले की, “दक्षिणेकडील राज्यांप्रमाणे विरोधकांना तुरुंगात टाकण्याची प्रथा आपल्या राज्यात नव्हती. पण आपल्या काळात (भाजपा) ही प्रथा सुरू झाली. छगन भुजबळ असतील, अनिल देशमुख असतील, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक या नेत्यांना सरकारने तुरुंगात टाकलं. अनेकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. परंतु या काळात भुजबळ, देशमुख, राऊत, आव्हाड, मलिक किंवा मुश्रीफ कुटुंबीयांवर काय वेळ आली असेल. अशा काळात घरातली माणसं घरात राहात नाहीत.”

हे ही वाचा >> “आमचे फोटो लावून खोके आणि मिंधे म्हणणं किती योग्य?” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सवाल

असे पायंडे पाडू नका : अजित पवारांची विनंती

पवार म्हणाले की, “गृहमंत्री कणखर असला पाहिजे. पूर्वी गोपीनाथ मुंडे राज्याचे गृहमंत्री होते. ते म्हणायचे दाऊदला (अंडरवर्ल्डमधला कुख्यात गुंड) फरफटत आणेन. पण तुमच्या सरकारच्या काळात विरोधकांना तुरुंगात टाकलं. असे नवे पायंडे कोणी पाडू नका. व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर उतरण्याची गरज नाही. अशा पद्धतीचं राजकारण करू नका. आपल्याला राजकारण करायला मोठं मैदान आहे. त्यापेक्षा आपण एक नवी संस्कृती सुरू करूया. तुमच्यापासून याची सुरुवात करावी. आम्ही त्याला सहकार्य करू.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 16:17 IST

संबंधित बातम्या