Sudhir Mungantiwar On Karnataka : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावमध्ये मराठी भाषिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्यास कर्नाटक सरकारने विरोध केला. त्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा संघर्ष तापला आहे. याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. यावरून राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
अशातच कर्नाटकमधील सिद्धरामय्या यांच्या सरकारने कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता यावरून भाजपाच्या नेत्यांकडून कर्नाटक सरकारवर टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत सिद्धरामय्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात विचारलं असता सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “खरंच हे खूप गंभीर आहे, कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल. ज्यांनी-ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. ते-ते एकतर पराभूत झालेत किंवा बुडलेत. आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आहे. मी हे विश्वासाने सांगतोय आज लेहून घ्या. पुढच्या निवडणुकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पराभव होईल. कारण त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला आहे”, असा हल्लाबोल सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान… pic.twitter.com/HAf4TMSC44This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 9, 2024
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत निंदनीय आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा अपमान करणारा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी भोगलेल्या यातना, त्यांचे बलिदान आणि त्यांचे विचार यांची अवहेलना करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे. सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरे यांनी सावरकरांच्या विचारांना मूठमाती दिली आहे. त्यामुळेच आज त्यांना ‘टीपू सेना’ म्हणण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार अमर आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांना इतिहास कधीही माफ करणार नाही”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.