भाजपाप्रणित एनडीएविरोधात देशातले २८ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात तयार केलेल्या आघाडीला I.N.D.I.A. (इंडिया) असं नाव दिलं आहे. या आघाडीत महााष्ट्रातले दोन पक्ष सहभागी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या आघाडीचे सदस्य आहेत. परंतु, देशात काही पक्ष असे आहेत जे एनडीएचे सदस्य नाहीत त्याचबरोबर इंडिया आघाडीचेही सदस्य नाहीत. यापैकी काही पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचा एआयएमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हे दोन पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्यास इच्छूक आहेत. परंतु, इंडिया आघाडीने त्यांना आघाडीचं निमंत्रण दिलेलं नाही.

एमआयएम आणि वंचितच्या काही नेत्यांनी इंडिया आघाडीने त्यांना सामावून घ्यावं अशी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आणि पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पूत्र सुजात आंबेडकर यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सुजात आंबेडकर यांनी शरद पवार गटातील आमदार रोहित पवारांना प्रश्न विचारला आहे की इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला आपल्याबरोबर घेण्याबद्दल एकवाक्यता का नाही?

आमदार रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी रोहित पवार म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीविरोधात उमेदवार देऊ नये. रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर सुजात आंबेडकर यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये सुजात यांनी म्हटलं आहे की इंडिया आघाडी आम्हाला आपल्यात सामावून घेत नसेल तर आम्ही काय करायचं? आम्ही निवडणूकच लढायची नाही का? आम्हाला जो सल्ला दिला जातोय, तोच सल्ला तुम्ही तुमच्या पक्षांना का देत नाही? देशातील वंचितांनी आणि बहुजांनी नेहमीच उच्चवर्णीयांसाठी बलिदान द्यावं असं वाटतंय का? जसं तुम्ही शतकानुशतके करत आला आहात.

हे ही वाचा >> “डेंग्यूसारखाच सनातन धर्मही….”, उदयनिधींच्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच भाष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुजात आंबेडकर यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी रोहित पवारांना उद्देशून म्हटलं आहे की भलेही इंडिया आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत तुम्ही सहभागी नसाल पण, इंडिया आघाडीच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्याबद्दल एकवाक्यता का नाही? वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीविरोधात उमेदवार उभा करू नये ही भूमिका घेताना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी स्वतः वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन मतांची फूट टाळण्याचा प्रयत्न का करू नये? ‘फोडा आणि राज्य करा’ ही भाजपाची निती स्पष्ट असताना वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीपासून दूर ठेवून फूट का पाडली जात आहे? सर्वांनी दोन पावलं मागे घेण्याची गरज असेल, तर जे आधीच मागे आहेत त्यांनी आणखी किती पावलं मागे जायचं?