Sunil Tatkare Reamark on Ajit Pawar meeting with Amit Shah : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी काही दिवसांपासून सर्व बैठका रद्द केल्या होत्या. गृहमंत्रीपदावरून ते महायुतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीमधील घटक पक्ष असेलल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सत्तास्थापनेच्या आधी मंत्रीपदं मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत पोहोचले. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं, मात्र अमित शाह चंदीगड दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची भेट झाली नाही. अमित शाह यांनी अजित पवारांची भेट नाकारल्याची देखील चर्चा सुरू झाली होती. मात्र या केवळ अफवा असल्याचं अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. अजित पवार व अमित शाह यांची आज सायंकाळी भेट होऊ शकते, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली आहे.

सुनील लटकरे यांनी अमित शाह यांनी अजित पवारांची भेट नाकारल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. तसेच ते म्हणाले, “आज संध्याकाळपर्यंत अजित पवार व अमित शाह यांची भेट होऊ शकते. अजित पवार हे केवळ अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला आले नव्हते. त्यांची इतरही अनेक कामं होती. त्याचदरम्यान शक्य असेल तर अमित शाह यांची भेट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे सध्या चंदिगडमध्ये आहेत. तर, अजित पवार आज दिल्लीत त्यांची खासगी कामं करतील आणि संध्याकाळी ते त्यांची राजकीय काम करतील. तसेच शक्य झाल्यास अमित शाह यांना भेटतील”.

हे ही वाचा >> बाटलीबंद पाणी आरोग्यासाठी अतिधोकादायक यादीत; खाद्य सुरक्षा विभागाचा मोठा निर्णय

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

दरम्यान,प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी तटकरे यांना यावेळी विचारलं की आज अमित शाह व अजित पवारांच्या भेटीत मंत्रिमंडळासंदर्भात, राष्ट्रवादीला कोणती खाती मिळणार यासंदर्भात चर्चा होणार का? त्यावर तटकरे म्हणाले, “आम्ही अद्याप मंत्रिमंडळासंदर्भातील चर्चेत पडलो नाही. आज अमित शाह व अजित पवार यांची भेट झाली तर त्यावर चर्चा होऊ शकते. उद्या भारतीय जनता पार्टी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत त्यांचा विधिमंडळ नेता निवडला जाईल. त्यारम्यान आम्ही, भाजपा नेते व शिवसेनेचे (शिंदे) नेते एकत्र बसून चर्चा करू.

हे ही वाचा >> ईव्हीएम हॅक करता येतं का? विरोधकांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने सांगितली मतमोजणीपर्यंतची सगळी प्रक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार हे त्यांचा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम सोडून दिल्लीला आलेले नाहीत. अमित शाहांच्या भेटीसाठी ते वेटिंगवर असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या बातम्या कुणाच्या सुपीक डोक्यातून आल्या आहेत ते मला माहिती नाही. मात्र, मी ठामपणे या सर्व बातम्यांचं खंडन करतो.