Sunil Tatkare on Conflicts in Mahayuti Ajit Pawar vs Ram Shinde & Mahendra Thorve vs Aditi Tatkare : “कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मी कटाचा बळी ठरलो”, असं येथील पराभूत उमेदवार व भाजपा नेते राम शिंदे यांनी म्हटलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा अवघ्या १,२४३ मतांनी पराभव केला आहे. या पराभवानंतर राम शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. राम शिंदे म्हणाले, “अजित पवारांनी मेढ्यात एक वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे की महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच त्यांच्यात कौटुंबिक (पवार कुटुंब) अघोषित करार झाला होता. किंबहुना कर्जत-जामखेडसंदर्भात असा करार झाला होता. माझ्याविरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलो आहे. मला आज त्याचा प्रत्यय आला. त्यांच्या राजकीय सारीपाटाने माझा बळी घेतला. आज अजित पवारांनी रोहित पवारांना स्वतःच सांगितलं की मी कर्जत-जामखेडला सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं? या सगळ्या राजकीय सारीपाटात मी बळी ठरलो आहे”.

राम शिंदे यांनी अजित पवारांबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर यावर अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तटकरे म्हणाले, “दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अजित पवार व रोहित पवार यांची भेट झाली. त्यावेळी अजित पवार जे काही म्हणाले, तो गमतीचा भाग होता. महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार प्रचार केला आहे. अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आहे. राम शिंदे पराभूत झाले आहेत. मी त्यांचं दुःख समजू शकतो. त्यांच्या दुःखाबद्दल मी काही बोलण्याचं कारण नाही. परंतु, त्यांनी देखील विनाकारण असं वक्तव्य करणं अयोग्य आहे”.

हे ही वाचा >> विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”

आदिती तटकरेंच्या मंत्रिपदाला शिवसेनेचा (शिंदे) विरोध

राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) एका बाजूला भाजपा नेत्यांशी संघर्ष चालू असताना दुसऱ्या बाजूला तटकरे यांनी शिवसेनेच्या (शिंदे) आमदारावरही टीका केली आहे. तसेच त्यांचा क्षुल्लक व्यक्ती, दखल घेण्यास अपात्र असा उल्लेख करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. शिवसेनेचे (शिंदे) आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतची विधानभा निवडणूक जिंकल्यानंतर एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, “तटकरे कुटुंबाने निवडणुकीत महायुतीचं काम केलेलं नाही. त्यामुळे आदिती तटकरे यांना मंत्री करू नये. त्यांच्या मंत्रिपदाला माझा विरोध असेल”.

हे ही वाचा >> देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजपा नेत्याचा दुजोरा, एकनाथ शिंदेंचं काय? म्हणाले, “भाजपाचा स्ट्राईक रेट..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तटकरेंची महेंद्र थोरवेंवर टीका

थोरवे यांच्या वक्तव्यावर सुनील तटकरे म्हणाले, “क्षुल्लक माणसाच्या प्रतिक्रियेपुढे काय बोलायचं? सोडून द्या तुम्ही त्यांना.. त्यांच्या प्रतिक्रियेची फार दखल घेण्याची गरज नाही. मुळात ते प्रतिक्रिया देण्यास पात्र नाहीत”. यावर तटकरेंना विचारण्यात आलं की तुमच्या या वक्तव्यामुळे किंवा अजित पवारांनी सकाळी केलेल्या वक्तव्यामुळे त्यानंतर राम शिंदे यांनी केलेल्या टिप्पणीमुळे महायुतीत मिठाचा खडा पडतोय असं तुम्हाला वाटत नाही का? त्यावर तटकरे म्हणाले, “आम्ही सगळे अभेद्य आहोत. कुणी काही वक्तव्य केल्यामुळे महायुतीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तसेच राम शिंदे यांनी जे वक्तव्य केलं ते अनुचित होतं”.