कराड : मुख्य पक्ष भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) घटक पक्ष असल्याने सार्वत्रिक अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणे हा विचारही आमच्या कोणाच्या मनात येऊ शकत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या चर्चा आहेत. पण, एकत्रिकरणाचा अधिकृत प्रस्तावच आलेला नसल्याचा खुलासाही त्यांनी या वेळी केला.
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधीस्थळी तटकरे यांनी अभिवादन केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, उदयसिंह पाटील आदींची उपस्थिती होती.‘महायुती’तील तिन्ही घटक पक्षांमध्ये अन्य पक्षातील लोकांचा सहभागाचा ओघ सुरूच असल्याने आगामी विधानसभा स्वतंत्रपणे लढण्याची ही तयारी आहे का? या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले, की पंडित नेहरूंनंतर नरेंद्र मोदींना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवण्याची संधी जनतेने दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आम्ही एकत्रित असल्याने लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्रपणे लढवण्याचा विचारही कधी आमच्या कोणाच्या मनात येऊ शकत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही एकत्रितपणे कसे सामोरे जाता येईल, यावर तिन्ही पक्षप्रमुख एकत्रित बसून चर्चा करतील. स्थानिक राजकीय परिस्थिती वेगवेगळी असल्याने त्याचा विचार केला जाईल. सर्वांना एकत्रित घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचा प्रयत्न असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळ समावेशासंदर्भात ते म्हणाले, भुजबळ यांचा समावेश आणि नाशिकचे पालकमंत्रिपद याचा काहीही संबंध नाही. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचे निर्णय ज्यावेळेला झाले, त्यावेळी त्याला स्थगिती देण्यात आली. यासंदर्भात लवकर निर्णय व्हावा, अशी आमची भूमिका असून, शेवटी सरकारमधील निर्णय एकत्रितपणाने लवकरच होतील, असे तटकरे म्हणाले. अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वीकारूनही, तेथील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न सुटलेला नसल्याकडे लक्ष वेधले असता तटकरे म्हणाले, पालकमंत्री होताच अजित पवारांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. विविध प्रश्न तत्परतेने हाती घेतले. तेथील गुन्हेगारीबाबत गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व अजित पवार कटाक्षाने लक्ष ठेवून असल्याचे तटकरेंनी सांगितले.
शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या विचारांपासून आम्ही तसूभरही बाजूला गेलो नाही. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांपासूनही कदापि बाजूला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.