Sunil Tatkare on Manikrao Kokate Remark Rummy : विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून कोकाटेंवर टीकेसह त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना कोकाटे यांनी मंगळवारी (२२ जुलै) पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं. “मला रमी खेळताच येत नाही”, असंही ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

माणिकराव कोकाटे यांनी यापूर्वी आणि कालच्या पत्रकार परिषदेत केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. याबाबत सुनील तटकरे म्हणाले, “माझं माणिकराव कोकाटे यांच्याशी बोलणं झालेलं नाही. मी दौऱ्यावर होतो, आत्ताच परत आलो आहे. कोकाटे यांचं आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणं झाले असेल तर मला त्याबद्दल माहिती नाही. परंतु, जबाबदार नेतृत्वाने खूप विचारपूर्वक वक्तव्ये केली पाहिजेत, असं मला वाटतं.”

सुनील तटकरे म्हणाले, “माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतील. विरोधकांनी जरी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर मला काही बोलायचं नाही. सशक्त लोकशाहीत प्रत्येकजण आपापलं काम करत राहतो. तसेच, काल माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत जे काही वक्तव्य केलं त्याबद्दल मी आधीच बोललो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माणिकराव कोकाटेंना प्रदेशाध्यक्ष तटकरेंकडून घरचा आहेर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “विधान भवनात जे काही घडतं त्यावर अध्यक्षांचं लक्ष असतं. विधानभवनाच्या परिसरातील सर्व घडामोडी या विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींच्या नियंत्रणात येतात. माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ कोणी चित्रित केला त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष तपास करतील. परंतु, ती गोष्ट उचित नव्हती. सभागृहात जे काही घडलं ते निंदणीय आहे. सभापती महोदय व अध्यक्षांनी याची सकल चौकशी करणे आवश्यक आहे. कदाचित त्यांनी चौकशी करण्यास सुरुवातही केली असेल. यासह विधानभवनात अलिकडे घडलेल्या घटना खूप क्लेषदायक आहेत. या घटना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत विधान मंडळाच्या परंपरेला गालबोट लावणाऱ्या आहेत.”