देशातील सर्व घटकांतील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्या नागरिकांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यावर खासदारांचे निलंबन केले जाते, यासह अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि केंद्र, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी २७ डिसेंबरपासून भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. तर ३० डिसेंबर रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. यावरून अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

“बारामती आणि शिरूर लोकसभेतील विद्यमान खासदार आदरणीय सुप्रियाताई व आदरणीय कोल्हे साहेब गुडघ्याला बाशिंग बांधून मैदानात उतरले आहेत. राज्यभर फिरणाऱ्या या दोन्ही मोठ्या नेत्यांना मतदारसंघात अडकून राहावे लागणे यातच अजितदादांचे महत्व अधोरेखित होते”, असा टोला अमोल मिटकरी यांनी एक्स पोस्टवरून लगावला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार असं शाब्दिक युद्ध रंगलं आहे. शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हेंनी जिंकावं म्हणून मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं होतं, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ते कसे जिंकतात तेच पाहतो असं म्हणत या मतदारसंघातून अजित पवार गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात येईल, असंही अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या आव्हानाला अमोल कोल्हेंनी स्वीकारलं असून आगामी निवडणुकीत माझाच विजय होईल, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

हेही वाचा >> अजित पवारांच्या आव्हानाचं दडपण आहे का? अमोल कोल्हे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांच्या आव्हानाचं दडपण मोर्चावर आहे का? या प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले, “सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी दडपण कसलं? अजित पवार मोठे नेते आहेत. त्यांच्यावर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यानं प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही. अजित पवार सरकार महत्वाचे घटक आहे. तेवढीच धडाडीची पावले अजित पवारांकडून पडावी हे शेतकऱ्यांसह आमचीही अपेक्षा आहे.”