केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मुक्ताई नगर भागात ही घटन घडली. याबाबत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनीही संताप व्यक्त केला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट लिहून सरकारला जाब विचारला आहे.

नेमकी काय घटना घडली?

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. यानंतर टवाळखोर तरुणांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्या.

सुप्रिया सुळेंची पोस्ट काय?

महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत का?

केंद्रीय मंत्री व भाजपाच्या नेत्या रक्षाताई खडसे यांच्या कन्येची काही टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक बाब आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची किती दुर्दशा झालीय हे या घटनेतून स्पष्ट होते. या राज्यात राहणारी प्रत्येक मुलगी सर्वप्रथम महाराष्ट्राची लेक आहे. तिच्या सन्मानाचं रक्षण करणं हे महाराष्ट्र शासनाचं आद्यकर्तव्य आहे. एक आई म्हणून मी रक्षाताईंना झालेल्या वेदना समजू शकते. याप्रसंगी मी त्यांच्यासोबत उभी आहे. राज्यातील मुलींची छेड काढणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन महिला सुरक्षेच्या संदर्भाने महाराष्ट्राला आश्वस्त करावे. अशी पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली आहे.

मोकाट आरोपींचा शोध सुरु

टवाळखोर व छेडछाड करूनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी अनिकेत भोई,पीयूष मोरे, सोम माळी,अनुज पाटील किरण माळी या पाच जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत भोई याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ खडसे यांनी काय म्हटलंय?

“राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. मुली पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घाबरतात. मुलींची सुरक्षा ही बाब अवघड आहे. मी माझ्या नातीला सांगितलं की तू स्वतः जाऊन तक्रार कर. आपण कुणालाही घाबरता कामा नये.” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.