ओडिशात २ जून रोजी मोठा रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात २८८ प्रवशांचा मृत्यू आणि ११०० जणांच्यावर गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर चहूबाजूंनी टीकास्र सोडलं जात होतं. पण, ही राजकारण करण्याची वेळ नसल्याचं प्रत्युत्तर अश्विनी वैष्णव यांनी दिलं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कॅग अहवालाचा दाखला देत केंद्र सरकारवर घणाघात केला आहे.

राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधीची रक्कम मसाज करणारे मशीन, क्रॉकरी आणि जॅकेट खरेदी करण्यासाठी वापरल्याचं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे. यावरून सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.

ट्वीट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “रेल्वेच्या सुरक्षेसाठी वापरणे अपेक्षित असलेला राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधीची रक्कम पायाचा मसाज करणारे मशीन, क्रॉकरी,जॅकेट अशा गोष्टी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ही रक्कम तब्बल ४८.२१ कोटी रुपयांची आहे. याखेरीज रेल्वे गरज नसलेल्या गोष्टींवर पैसा उधळत असल्याचे निरीक्षण देखील या अहवालात नमूद आहे.”

हेही वाचा : नव्या नियुक्तींमुळे अजित पवारांवर अन्याय झाल्याचं वाटतं? नारायण राणे म्हणाले, “शरद पवारांना…”

“या अतिशय गंभीर बाबी आहेत. केंद्र सरकार रेल्वेच्या सुरक्षेबाबत गंभीर नव्हते. यामुळेच भीषण अपघात होऊन अनेक प्रवासी प्राणास मुकले. प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा उधळपट्टीला प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारने जनतेची माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

हेही वाचा :“…म्हणजे अजूनही ‘मातोश्री’चा धसका कायम आहे,” संजय राऊतांचं अमित शाहांना प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅगच्या अहवालात काय?

२०१७ साली मोदी सरकारद्वारे मंजूर करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा निधीचा दुरूपयोग केल्याचा आरोप कॅगच्या अहवालात करण्यात आला आहे. मोदी सरकारकडून राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधीच्या माध्यमातून पायाचा मसाज करणारे मशीन, क्रॉकरी, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, फर्निचर, जॅकेट, कॉम्प्युटर, उद्यान विकसित करणं, शौचालय बांधणं, वेतन आणि बोनस देण्यात करण्यात आल्याचं कॅगच्या अहवालात नमूद केलं आहे. ‘द टेलिग्राफ’ने याबाबत वृत्त दिलं आहे.