चंद्रपुरात दाखल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधताना पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील प्रश्नाबरोबरच थेट त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का या प्रश्नावरही उत्तरं दिली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळेंनी दिलेल्या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार आहेत. चंद्रपुरात दाखल झालेल्या सुप्रिया सुळेंच्या या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी चर्चा केली. सुळे यांचे जोरगेवार समर्थकांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

नक्की वाचा >> CM पदावरुन सेना विरुद्ध NCP: मनसे म्हणते, “काही दिवसांत सुप्रिया महिला मुख्यमंत्री आणि संजय राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोरगेवार यांच्या मातोश्री ‘अम्मा’ यांची सुळे यांनी भेट घेत चंद्रपूर मतदारसंघात त्यांनी राबविलेल्या विविध कल्पक योजनांची माहिती करून घेतली. “त्यांचे लाडक्या सुपुत्रांची भेट झाली तेव्हा त्यांनी ताडोबाला कधी येणार असं विचारलं. त्यावर मी ताडोबाला आता नाही येणार पण चंद्रपूरला येणार आहे असं सांगितलं होतं. ते म्हणाले होते की माझ्या घरी यावं लागले. मी १०० टक्के येणार असं सांगितलं होतं. त्यानुसार मी ‘अम्मांना’ भेटायला आले आणि त्यांच्या अम्मा का डब्बा प्रकल्पाच्या प्रेमात पडले. एका कतृत्वान आईने शून्यातून सगळं उभं केलं. त्यांनी सुरु केलेला हा डब्बावाला प्रकल्प फारच सुंदर असून मी त्यांच्या कामाच्या प्रेमात पडलेय इतकं छान काम सुरु आहे इथं,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तुम्ही महिलांना भेटत आहात, त्यांच्यासंदर्भातील कार्यक्रम राबवत आहात. आम्हाला कधी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला पहायला मिळेल का?, असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया यांना विचारला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी, “एक तर मी लोकसभा लढतेय. तुम्हाला नागरिकशास्त्राची जाण असेल. २०२४ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला एवढीच विनंती करीन की मला बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने तिकीट द्यावं,” असं हात जोडून सांगितलं.

नक्की वाचा >> ‘हिंदूंच्या रक्ताचे पाट’, ‘उद्धव ठाकरेंचा दिलदारपणा’ अन् ‘हिंदूंच्या पलायनासाठी मोदी सरकारकडून भाड्याने ट्रक’; शिवसेनेचा हल्लाबोल

त्यानंतर थेट “मुख्यमंत्री व्हायची तुमची इच्छा आहे का?” असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. त्यावरही त्यांनी रोकठोक उत्तर दिलं. “मी पदासाठी कुठलंही काम आयुष्यात करत नाही. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सेवाभावी काम मी करते. त्यामुळे मी पदाचा फारसा विचार करत नाही. मला खासदारीमध्ये खूप रस आहे त्यामुळे २०२४ साली मी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडे मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा तिकीट द्यावं अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करणार आहे,” असं सुप्रिया म्हणाल्या. या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचे संकेत दिलेत.

सुप्रिया सुळेंनी पुढला मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असू दे म्हटलेलं
सुप्रिया सुळे यांनी मागील रविवारी (२९ मे २०२२ रोजी) उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तसेच येथील लोकांसोबत चर्चा केली. सुप्रिया सुळेंनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचेदेखील दर्शन घेतले. या दर्शनानंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार’ असं साकडं घातलं. उस्मानाबादमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तरही सुप्रिया यांनी दिलं. “मी याबद्दल सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष सांगणारी नाही. मुख्यमंत्री व्हावं की नाही याबाबत मी कधी विचार केलेला नाही. हे सगळं महाराष्ट्रातील लोक ठरवतील मी कसं ठरवणार,” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणामध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलंय. त्याच पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी थेट सुप्रिया यांनाच हा प्रश्न विचारला.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज्यसभा निवडणुकीत पराभूत कोण होणार?

जोरगेवार यांनी तुम्हाला आता घड्याळ दिलं. तुम्ही त्याचा स्वीकारही केलं. आता तुम्ही जोगेवारांच्या हातावर घड्याळ कधी बांधणार?, असा प्रश्न अन्य एका पत्रकाराने सुप्रिया यांना विचारला. “मी इथे जोरगेवार यांच्या आईंना आणि कुटुंबाला भेटायला आलेय. काही नाती ही राजकारणापलीकडची असतात. आजकाल दुर्देव झालंय महाराष्ट्राच्या राजाकरणामध्ये मनापासून कोणी काही करु इच्छित नाही,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. या कौटुंबिक भेटीच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी जोरगेवार यांची नाराजी दूर केल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule on chief minister post says i dont work for posts scsg
First published on: 06-06-2022 at 16:05 IST