राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २४ वा वर्धापन दिन होता. या दिनाचं औचित्य साधत शरद पवारांनी सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांच्यासह विविध नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या. शरद पवारांनी स्वत: याबाबत घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष कोण असणार? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्याने या दोघांपैकी एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत विचारलं असता शरद पवारांनी थेट उत्तर दिलं आहे.

हेही वाचा- सुप्रिया सुळेंची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने अजित पवार नाराज? रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“अध्यक्ष पदाची जागा अजून रिक्त झालेली नाही. ही जागा जेव्हा रिक्त होईल, तेव्हा अध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल विचार केला जाईल” असं थेट विधान शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल किंवा सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली असली तरी याच दोघांपैकी एक नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा भावी अध्यक्ष असेल, या चर्चांना शरद पवारांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे. अध्यक्षपदाची जागा जेव्हा रिक्त होईल, तेव्हा नवीन चेहऱ्याचा स्वतंत्र विचार केला जाईल, अशा आशयाचं सूचक विधान शरद पवारांनी केलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- नवीन नियुक्त्या करत शरद पवारांनी अजित पवारांचे पंख छाटले? संजय राऊतांचं थेट विधान, म्हणाले…

दरम्यान, शरद पवारांनी अजित पवार जयंत पाटील यांच्या नाराजीवर भाष्य केलं. यावेळी पवार म्हणाले, “अजित पवार यांच्याबद्दल सुरू असलेल्या वृत्तांमध्ये १ टक्काही सत्य नाही. नव्या निवडीनंतर दोन लोक नाराज असल्याचं वृत्त चालवलं जात आहे. यातील एक म्हणजे जयंत पाटील हे महाराष्ट्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ही जबाबदारी त्यांच्याकडं आहे. तर, अजित पवारांकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्याकडं कोणतीही जबाबदारी नाही. पक्षासाठी वेळ देण्याची त्यांची तयारी असल्याने ही नियुक्ती करण्यात आली. नाराजीच्या चर्चा चुकीच्या आहेत. आज करण्यात आलेल्या नियुक्तींबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांबरोबर मागील एक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यावर आज निर्णय घेण्यात आला,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule or prafull patel who will be next chief of ncp sharad pawar give answer rmm
First published on: 10-06-2023 at 18:11 IST