फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. टाटा एअर बस प्रकरणात सरकारने वस्तूस्थिती समोर आणावी. राज्यातील गुंतवणूक दुसरीकडे कशी जाते हा नागरिक म्हणून प्रश्न पडतो. असं त्या म्हणाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “आता आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी काय करायचं? आरती करा, हनुमान चालीसा करा…”; छगन भुजबळांचं विधान!

पत्रकारपरिषदेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही(भाजपा) म्हणत आहात एक वर्षापूर्वीच गेला. नंतर तुम्ही म्हणत आहात की आम्ही हा प्रकल्प नागपूरलाच करणार आहोत आणि नंतर म्हणत आहात की उपमुख्यमंत्री मन वळवण्यात कमी पडले. त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळं बोलते. त्यामुळे मी प्रचंड गोंधळले आहे. मी विरोधक म्हणून विचारत नाही. मी या राज्याची एक नागरिक आहे. या देशाची एक नागरिक आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मला वाटतं हा आपल्या सगळ्यांनाच अधिकार आहे की नक्की सत्य काय आहे.

हेही वाचा – २६/११ चा हल्ला कोणीही विसरू शकणार नाही, तो दिवस सर्वांसाठी काळा दिवस होता – एकनाथ शिंदे

याशिवाय त्यांनी भाजपाकडून आयोजित करण्यात आलेल्या मराठी दिवाळी कार्यक्रमाच्या जाहिरातबाजीवरही टिप्पणी केली. “ मराठी दिवाळी साजरी करताय, मला दिवाळी असते हे माहिती होतं. पण माझी विनम्र विनंती आहे की मराठी दिवाळीचा अर्थ काय? म्हणजे त्यांनी जी स्वत:ची जाहिरात केली त्यातून बेस्टला जर पैसे मिळणार असतील तर आनंदच आहे. त्यामुळे जाहिराती नक्कीच करा परंतु लोकालोकांमध्ये एवढं विभाजन कशासाठी? मराठी भाषेवर जर प्रेम असेल तर कृती करून दाखवा. मराठी वाचनालये आहेत त्यांना मदत करा, मराठी भाषेसाठी काहीतरी वेगळं करा. तसं न करता केवळ स्वत:च्या जाहिरातबाजीत मराठीपणा नकोय. आम्ही मराठी लोक फार स्वाभिमानी आहोत. पण आम्ही भारतीय आहोत याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मराठी असण्याचाही सार्थ अभिमान आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule targets shinde fadnavis government over tata air bus project msr
First published on: 28-10-2022 at 18:11 IST