Suresh Dhas on Meeting with Dhananjay Munde : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया , मनोज जरांगे पाटील यांच्यासह भाजपाचे आमदार सुरेश धस अशा काही नेत्यांना हे प्रकरण लावून धरल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे संबंध असल्याचा मुद्दा या नेत्यांकडून सातत्याने उपस्थित करण्यात आला आहे. यादरम्यान आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळे आरोप करणारे भाजपाचे नेते सुरेश धस हेच धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवास्थानी जाऊन भेटले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान स्वत: सुरेश धस यांनी या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच आपण डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचे म्हणाले आहेत. “मी स्वत: दिवसा त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गजहब करण्यासारखं काय आहे?,” असे सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले.

“परवा जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची चौकशी करणे यात काही गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी यामध्ये कसल्याही प्रकारचा संबंध नाही. कृपया जोडू नये”, असे सुरेश धस म्हणाले.

सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात काय चर्चा झाली? या प्रश्नावर बोलताना धस म्हणाले की, “काहीही चर्चा झाली नाही. फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मी निघून आलो”.

“अदल्या रात्री दवाखान्यात नेण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी निवासस्थानी जाऊन भेटलो. भेटल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यानंतर काय केलं ते पाहून घ्या. पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही गोष्टी सांगणार आहे”, असेही सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लढा सुरू राहणार का?

“मी अजूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही, हे मी पहिल्यापासून सांगतोय. त्यांचा राजीनामा त्यांच्या पक्षाचेच लोक आणि इतर लोक राजीनामा मागत आहेत. त्यांचा राजीनामा घेणं – न घेणं हे सर्वस्वी अजित पवारांच्या हातात आहे. लढा सुरूच राहणार आहे. हे लोक फाशीवर जाईपर्यंत हा लढा सुरूच राहाटणार आहे,” असेही धस यावेळी म्हणाले.