सुशांत सिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा भारतीयांच्या मनातील निर्णय आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते नारायण राणे यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे. यावेळी नारायण राणे यांनी सरकारमधील एका व्यक्तीसाठी आपला वापर करु नये असा सल्ला मुंबई पोलिसांना दिला आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“ही वेळ का आली याचं महाराष्ट्र सरकारने आत्मपरीक्षण करावं. हे सरकार जनतेसाठी नाही, तर सत्तेचा दुरुपयोग आपल्यासाठी कसा करावा यासाठी आहे. त्यामुळे हा निर्णय अतिशय योग्य आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपलं तोंड बंद करावं असं मला वाटतं असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
सुशांत सिंह प्रकरण: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“….रिया चक्रवर्तीची लायकी नाही,” बिहारचे पोलीस महासंचालक मीडियासमोरच संतापले

“पोलिसांनी आपली शान, कायदा राखण्यासाठी योग्य तपास केला पाहिजे. अजूनही कोणाला अटक नाही, ८ तारखेच्या पार्टीचाही तपासही नाही. त्यामुळे हे घडणारच होतं. ज्या प्रकारे सरकार पोलिसांचा वापर करत होतं, सगळ्या गोष्टी हाताळत होतं ते संशयास्पद होतं. आता काही केलं तरी पोलिसांच्या विरोधात गोळी सुटली आहे. एका व्यक्तीसाठी आपला वापर करुन का असं मला मुंबई पोलिसांना सांगायचं आहे,” असं नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं.

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने निर्णय सुनावताना, मुंबई पोलिसांना सर्व पुरावे सीबीआयकडे हस्तांतरित करण्यास सांगितलं. तसंच सीबीआयला तपासात सहकार्य करण्यासही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात दाखल झालेला एफआयआर योग्य असल्याचं यावेळी म्हटलं.