Sushma Andhare On Rupali Chakankar : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या करत स्वत:चं जीवन संपवल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आज सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
सुषमा अंधारेंना हक्कभंगाची नोटीस
“आजच्या पत्रकार परिषदेत दोन महत्वाच्या घडामोडी सांगितल्या पाहिजेत. खरं तर हक्कभंग प्रस्तावाच्या अनुषंगाने त्यांनी मला माझं मत विचारलं, त्यावर मी माझं मत विधीमंडळाला पाठवलं. माझ्या विरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव प्रवीण दरेकरांनी वाचून दाखवला होता. त्यावर माझं स्पष्टीकरण मागवलं होतं, ते मी आता दिलं आहे. अद्याप पुढील अधिवेशनाला वेळ आहे. मात्र, फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या घडामोडी सुरू असताना अचानक काल माझ्या घरी पुन्हा एक हक्कभंगाची नोटीस आली”, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे.
‘५० कोटींच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस’
“अनिल बोरनारे यांच्या स्वाक्षरीने हक्कभंगाची नोटीस आली आहे. ती नोटीस अद्याप माझ्या हातात आलेली नाही, कारण मी मुंबईत आहे आणि नोटीस पुण्यात आलेली आहे. तसेच दुसरी घटना म्हणजे ५० कोटींच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस देखील मला आली आहे. या दोन्ही नोटीशींचा मी स्वीकार करते”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
सुषमा अंधारेंची महिला आयोगावर टीका
“मी काल पत्रकार परिषदेत फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाबाबत बोलताना काही गोष्टी मांडल्या होत्या. त्यामध्ये राज्य महिला आयोगाबाबत मी काही सवाल उपस्थित केले. आता जेव्हा एखादी घटना घडते, तेव्हा त्या ठिकाणी आढळून येणारे साहित्य अर्थात मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा इतर गोष्टी जर असतील तर त्या सील केल्या जातात. त्याची माहिती गोपनीय असते. त्यानंतर माहिती न्यायालयाच्या परवानगीने पुढे तपास केला जातो”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
“पण आम्ही फलटणच्या प्रकरणात सीडीआरची मागणी करत आहोत, त्याबाबत कोणतीही काही बोलत नाही. मात्र, या प्रकरणात मुलीच्या सीडीआरबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा बोलतात. आता मला पोलिसांना काही प्रश्न विचारायचे आहेत. पोलिसांना हा अधिकार कोणी दिला? कारण महिला आयोगाने कोणत्या अधिकाराने सीडीआरबाबत माहिती पत्रकार परिषदेत सांगितली? त्यांना तो अधिकार आहे का? जर तो अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला आयोगाच्या पदावर ठेवावं की नाही? याचा विचार करावा”, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
“राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य महिला आयोगावर राजकीय हेतून प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागवायला हवं. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बदनामी केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा सुनील तटकरे यांनी तातडीने राजीनामा घ्यावा”, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
