Sushma Andhare teases Sanjay Shirsat over Income Tax Notice : शिवसेनेचे (शिंदे) नेते व सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. यासह शिवसेनेचे (शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील नोटीस आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. दरम्यान, आयकर विभागाच्या माध्यमातून शिवसेनेवर (शिंदे) दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. यावर मंत्री शिरसाट म्हणाले, “शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हणता येणार नाही. आयकर विभाग त्यांच्या पद्धतीने काम करत असतो. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू. त्यांना हवी ती माहिती देऊ.”
संजय शिरसाट म्हणाले, “तपास यंत्रणा त्यांचं काम करत असतात. त्यांना एखादी तक्रार आली, त्यांना काही वाटलं तर अशा प्रकरणांमध्ये तपास करण्याचा त्यांना अधिकार असतो.” तसेच यावेळी त्यांनी दावा केला होता की खासदार श्रीकांत शिंदे यांना देखील अशी नोटीस आली आहे. मात्र, काही तासांनी शिरसाट यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं. त्यांनी सांगितलं की “श्रीकांत शिंदे यांना अशी कुठलीही नोटीस आलेली नाही.”
दरम्यान, आयकर विभागाच्या नोटिशीवरून शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेला (शिंदे) चिमटा काढला आहे. अंधारे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “रंग बदलणाऱ्या सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढाच फरक आहे, सरडा धोका बघून रंग बदलतो आण माणूस मोका (संधी) बघून रंग बदलतो. गुरुपौर्णिमेचा मोका असला म्हणून काय झालं, आयकर विभागाच्या नोटीशीचा धोका त्यापेक्षा मोठा आहे. दिघे साहेब बघताय ना?”
श्रीकांत शिंदेंनाही आयकर विभागाची नोटीस?
संजय शिरसाटांपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना देखील आयकर विभागाची नोटीस आल्याच्या वृत्ताने मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर येत त्यांचं वक्तव्य मागे घेतले. ते म्हणाले, “प्रसारमाध्यमांनी माझ्या तोंडी हे वाक्य चालवल्याने गोंधळ झाला आहे. मला आयकर विभागाची नोटीस आली आहे. मात्र, काही पत्रकारांनी विचारले की श्रीकांत शिंदे यांना देखील नोटीस आली आहे का? त्यावर मी त्यांना म्हटलं नोटीस आली असेल तर मला काही माहिती नाही. त्यांना खरंच अशी नोटीस आली आहे की नाही याची मला कल्पना नाही. प्रसारमाध्यमांनी ते वाक्य माझ्या नावाने प्रसरित केलं आहे.”