मच्छीवर सेस आकारणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची चार नाकी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी उद्ध्वस्त केली.सुमारे दहा ते पंधरा तरुण कार्यकर्त्यांनी घोषणा देत तोडफोड आणि जाळपोळ केल्याची तक्रार बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वसुली नाकी उभी केली आहेत. या नाक्यांवरून मच्छीवरील सेस वसुलीचे काम केले जाते. शासन निर्णयानुसार ही कार्यवाही केली जात नाही, त्यामुळे ही नाकी प्रशासनाने दोन दिवसांत बंद करावीत, अन्यथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकत्रे आपल्या स्टाईलने ती बंद करतील, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रत्नागिरीतल्या परटवणे-उद्यमनगर दरम्यान असलेल्या तपासणी नाक्याची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात झाली.  ठसेच कुवारबाव येथील तपासणी नाक्यावरील साहित्याचे नुकसान करण्यात आले. पावस रस्त्यावरील   भाट्ये येथील केंद्रात धुडगुस घातल्यानंतर १० ते १५ कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा उद्यमनगरकडे वळविला. त्यानंतर कुवारबाव येथील केंद्राकडे कार्यकत्रे गेल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. तोडफोड करताना कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षाच्या घोषणा दिल्याचे त्यांनी सांगितले.

बाजार समितीचे कर्मचारी समीर विष्णू कवठणकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या जाळपोळीत नाक्यांचे नुकसान झाले असून पावतीपुस्तके, हजेरी पुस्तकांचे असे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. कुवारबाव तपासणी नाक्याची तोडफोड करण्यासाठी गेलेले कार्यकत्रे तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत. त्या फुटेजचा आधार घेऊन पोलिस संबंधितांवर कारवाई करणार आहेत. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.