scorecardresearch

“… तर ऊस गळीत हंगाम जोमात असताना तो बंद पाडू” ; राजू शेट्टींचा इशारा!

‘एकरकमी एफआरपी’साठी स्वाभिमानी – बळिराजा शेतकरी संघटना एकत्र

“… तर ऊस गळीत हंगाम जोमात असताना तो बंद पाडू” ; राजू शेट्टींचा इशारा!

– विजय पाटील

राज्यातील ३०-३५ साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी द्यायला जमतं, तर सहकारमंत्र्यांनाच काय अडचण? आणि कायद्याने एकरकमी एफआरपीचा हक्क असताना तो डावलला जात असेल, तर तसे करणारे साखर कारखाने का सुरू होऊ द्यावेत? असे प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपस्थित केले आहेत.तसेच, ऊस उत्पादकांवर अन्याय झाल्यास ऊस गळीत हंगाम जोमात असताना तो बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

ऊसाच्या एकरकमी किमान रास्त दराच्या मुद्यावर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी व बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी एकजूट दाखवत संयुक्त पत्रकार परिषदेत एकरकमी एफआरपीसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन सन २०१३ प्रमाणे तीव्र आंदोलन छेडू आणि सहकारमंत्र्यांसह साखर कारखानदारांच्या उरावर बसू, असा इशारा दिला. याप्रसंगी दोन्ही संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले, “ज्येष्ठनेते यशवंतराव चव्हाण व पी. डी. पाटील यांचा वारसा सांगत बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. पण, शेतकऱ्यांना कायद्याने त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळवून देण्याऐवजी ते शेतकऱ्यांचे रक्षक नव्हे तर भक्षकासारखे वागत आहेत.” तसेच, ते सहकारमंत्री आहेत की केवळ सह्यााद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत हे समजून येत नसल्याचा टोला देखील यावेळी शेट्टी यांनी लगावला. केवळ केंद्र सरकारचेच बरोबर आणि इतर सारे अन्यायी म्हणणाऱ्यांशी आमचे व शेतकऱ्यांचेही काही देणेघेणे नसल्याचे ते सदाभाऊ खोत यांना उद्देशून म्हणाले.

साखरेची ३ हजार १०० रूपये किंमत धरून एफआरपी ठरवण्यात आली. मात्र, सध्या साखरेची निविदा ३ हजार ७०० रूपये दरांवर पोहचली असल्याने हा सुवर्णकाळ ठरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा तुटवडा असल्याने साखरदर अगदीच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखानदारांची पाचही बोटे तुपात असली तरी त्यांच्याकडून अडचणीतील शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी एफआरपीचे तुकडे केले जात असल्याबाबत शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याचबरोबर, एकरकमी एफआरपी आणि त्यावर अधिकची रक्कम मिळावी अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारने शेतीच्या नुकसानीपोटी गुंठ्याला केवळ दीडशे रूपये देऊन थट्टा केली आहे. अशावेळी एफआरपी व अधिकची रक्कम मिळून नुकसान भरून निघेल अशी आशा होती. पण, त्यावरही पाणी फिरवण्याचे काम होत आहे. साताऱ्यात आज ऊस दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. मात्र, बाळासाहेब पाटलांमुळेच ती रद्द झाल्याचा संशय असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2021 at 19:07 IST

संबंधित बातम्या